व्यावसायिकासह डॉक्टर महिलेकडे ३१ लाखांची चोरी

चोरीच्या गुन्ह्यांतील महिलेसह नोकरांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – सुरतच्या व्यावसायिकाची सुमारे २७ लाखांची कॅश तर ७४ वर्षांच्या वयोवृद्ध डॉक्टर महिलेच्या घरातून ४ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या महिलेसह दोन्ही नोकरांना कांदिवली आणि एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. अरुणकुमार अकलेश रावत आणि स्वामिनी सचिन श्रीवास्तव ऊर्फ स्वामिनी सुरज भांगडे ऊर्फ सोनी अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून चोरीच्या कॅशसहीत सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी अरुणकुमारला पोलीस तर स्वामिनीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

चंद्रप्रकाश कालुराम व्यास हे सुरतचे व्यावसायिक असून त्यांचा तिथेच मॅरेज हॉलचा व्यवसाय आहे. त्यांना एक नवीन हॉटेल सुरु करायचे होते. हॉटेलसाठी लागणार्‍या इंटेरियल डिझायनिंगचे साहित्य घेण्यासाठी २४ एप्रिलला ते त्यांचा नोकर अरुणकुमारसोबत मुंबईत आले होते. अनेकदा ते मुंबईत कामानिमित्त येत असल्याने त्यांनी बोरिवलीतील योगीनगर, योगी पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. मुंबईत आल्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरमध्ये २७ लाखांची कॅश ठेवली होती. दुसर्‍या दिवशी ते कामानिमित्त भिवंडी येथे गेले होते. यावेळी त्यांचा नोकर फ्लॅटमध्ये एकटाच होता. सायंकाळी चार वाजता ते घरी आल्यानंतर त्यांना अरुणकुमार २७ लाखांची कॅश घेऊन पळून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या अरुणकुमारचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला सोमवारी पोलिसांनी चोरीच्या कॅशसहीत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसर्‍या घटनेत स्वामिनी श्रीवास्तव या महिलेस कांदिवली पोलिसांनी अटक केली. ७८ वर्षांची सुशिला टेकचंद कृपलानी ही वयोवृद्ध महिला डॉक्टर असून ती कांदिवलीतील लालजीपाडा, श्री निकेशन सोसायटीमध्ये राहते. तिच्या घरी स्वामिनी आणि निता नावाच्या दोन महिला काम करतात. निता ही तीन तर स्वामिनी ही सात महिन्यांपासून काम करत आहे. ऑक्टोंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत स्वामिनीने घरात काम करताना कपाटातून ४ लाख ३० हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने चोरी केले होते. हा प्रकार अलीकडेच सुशिला कृपलानी हिच्या लक्षात आले होते, त्यामुळे तिने स्वामिनीकडे विचारणा केली होती. यावेळी तिने चोरीची कबुली देताना सर्व दागिने परत देण्याचे आश्‍वासन दिले होते. तिच्या कबुलीनंतर सुशिला यांनी कांदिवली पोलिसांत तिच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून स्वामिनीला अटक केली. तिच्याकडून चोरीचे काही दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page