मानसिक नैराश्यातून ६५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची आत्महत्या
इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – मानसिक नैराश्यातून सिताबाई शिवाजी माने या ६५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेने सोमवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी घेऊन सिताबाई हिने जीवन संपविले. तिच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. या आत्महत्येबाबत तिच्या मुलाने कोणावर संशय किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे मुलुंड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
ही घटना सोमवारी दुपारी मुलुंडच्या आर. पी रोड, भीमवाडीतील एका निवासी इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर सिताबाई माने ही तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ती प्रचंड नैराश्यात होती. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या मुलासह सूनेचे प्रयत्न सुरु होते. तिच्यावर एका खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारातून तिला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ती आणखीन नैराश्यात होती. दुपारी ती बाल्कणीजवळ आली आणि तिने सोळाव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिचा मृतदेह नंतर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी सिताबाईच्या मुलाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यात त्याने त्याची आई सिताबाई हिने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला. या घटनेला कोणीही जबाबदार नाही किंवा त्यांची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.