मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या फायरिंगप्रकरणी गुन्हे शाखेने चारही आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई सुरु केली होती. सोमवारी चारही आरोपींना मोक्का कायद्यांतर्गत अटक करुन मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल आणि अनुजकुमार ओमप्रकाश थापन यांना ८ मेपर्यंत पोलीस तर आजारी असलेल्या सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याला वैद्यकीय कारणासाठी चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. या चौघांनाही सोमवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते.
१४ एप्रिलला सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच त्याचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन दिवसांत गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा पर्दाफाश करताना गुजरातच्या भुज शहरातून फायरिंग करणार्या विकीकुमार सागरकुमार या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नाव समोर आले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात सोनूकुमार आणि अनुजकुमार या दोघांना पंजाब येथून अन्य एका पथकाने अटक केली होती. यातील विकीकुमार आणि सागरकुमार यांनी सलमान खान याच्या घरासमोर गोळीबार केला होता तर इतर दोघांनी गोळीबारासाठी त्यांना शस्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत शनिवारी गुन्हे शाखेने चारही आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी चारही आरोपींना पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत अटक केली होती. अटकेनंतर या चौघांनाही पोलीस बंदोबस्तात मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्या. ए. एम पाटील यांनी विकीकुमार, सागरकुमार आणि अनुजकुमार या तिघांनाही सोमवार ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर वैद्यकीय कारणास्तव सोनूकुमारला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यावेळी सरकारी वकिल जयसिंग देसाई यांनी युक्तिवाद करुन आरोपींची पोलीस कोठडीची मागणी केली होती. या गुन्ह्यांचा तपास बाकी असल्याने आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. या गुन्ह्यांत गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. लॉरेन्स हा साबरमती जेलमध्ये असून त्याचा लवकरच गुन्हे शाखेकडून ताबा घेतला जाणार आहे. अनमोल हा विदेशात वास्तव्यास असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. अनमोलच्या अटकेसाठी इंटरपोलच्या मदतीने भारताने प्रयत्न सुरु केले आहे.