बिलामधील ऍपमध्ये फेरफार करुन ११.६७ लाखांवर डल्ला
रसवंतीच्या मॅनेजरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मालकाने विश्वासाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापरासह ऍपमधील बिलामध्ये फेरफार करुन मॅनेजरनेच ११ लाख ६७ हजाराचा अपहार करुन मालकाची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रौशनकुमार सतुर्धन यादव या आरोपी मॅनेजरविरुद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पळून गेलेल्या मॅनेजरच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
४७ वर्षांचे तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून ते अंधैरी परिसरात राहतात. त्यांचे अंधेरी येथे कानिफनाथ रसवंतीगृह असून तिथे पाच कर्मचारी कामाला आहेत. त्यापैकी रौशनकुमार हा मॅनेजर म्हणून काम करत असून तो मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहे. त्याच्यावर रसवंतीगृहासह सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. बिलिंगसाठी त्यांनी पेटपूजा नावाचे एक ऍप सुरु केले होते. या ऍपच्या सहाय्याने सर्व आर्थिक व्यवहार चालत होते. दिवसभरातील सर्व हिशोब रात्री उशिरा तो तक्रारदारांना व्हॉटअपच्या माध्यमातून सांगत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्यवसायात नुकसान होत असल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे त्यांनी पेमेंट ऍपच्या संगणकीय नोंदी, बिलिंग डेटा, पेमेंट व्यवहार, लेखा पुस्तके आणि इतर आर्थिक नोंदीची चौकशी केली होती. त्यात त्यांना मॅनेजर रौशनकुमारने पेट पूजा बिलिंग ऍपच्या माध्यमातून संगणकीय प्रणालीमध्ये बोगस दिशाभूल पेमेंट नोंद केल्याचे दिसून आले.
ग्राहकांकडून येणार्या मूळ बिलात फेरफार करुन तो पैशांची अफरातफर करत होता. त्यामुळे त्यांना गेल्या काही महिन्यांत प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. ऍपमधून बिल डिलीट करताना येत नाही असे त्यांना वाटत होते, मात्र रौशनकुमार हा बिलाच्या रक्कमेत बदल करुन पैशांचा अपहार करत होता. ग्राहकाने दिलेले ऑर्डर पूर्ण स्विकारल्यानंतर कस्टमर पेट पूजा बिलिंग ऍपच्या माध्यमातून बिलाची पावती द्यायचा, कस्टमरने बिल पेड केल्यानंतर तो पुन्हा ऍपमध्ये जाऊन मूळ बिलामध्ये फेरफार करुन मूळ बिलाची रक्कम कमी करत होता.
११ नोव्हेंबर २०२३ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत त्याने ऍपमधील बिलांमध्ये फेरफार करुन ११ लाख ६७ हजार ९७५ रुपयांचा अपहार केला होता. याबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करुन ऍपच्या माध्यमातून बिलामध्ये फेरफार करुन या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. या प्रकारानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मॅनेजरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रौशनकुमार यादव याच्याविरुद्ध पोलिसांनी पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.