ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना अटक

एक आरोपी युपीएससीच्या विद्यार्थी; झटपट पैशांसाठी केली फसवणुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना जुहू आणि वाकोला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. उमेश रंजक आणि विशाल वसंत पवार अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील उमेश हा युपीएससीचा विद्यार्थी असून झटपट पैशांसाठी तो फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकी आले आहे. या दोघांच्या अटकेने फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार सांताक्रुज येथे राहत असून व्यवसायाने कापड व्यावसायिक आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांना एका कुरिअर कंपनीतून फोन आला होता. यावेळी या व्यक्तीने त्यांचे क्रेडिट कार्ड आल्याचे सांगून त्यांना एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यात त्यांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्यास सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी ती लिंक ओपन करुन त्यांची माहिती अपडेट केली होती. काही वेळानंतर त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून सुमारे साडेचार लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. फसणुकीचा हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वाकोला पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन उमेश रंजक याला बिहारहून अटक केली. तपासात उमेश हा युपीएससीची परिक्षा देत होता. त्यासाठी तो दिल्लीला गेला होता. तिथे त्याची काही तरुणांशी ओळख झाली होती. ते बोगस लिंक पाठवून ऑनलाईन फसवणुक करत होते. त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्यानेही अशाच प्रकारे लिंक पाठवून फसवणुक करण्यास सुरुवात केली होती. झटपट पैशांसाठी त्याने ही फसवणुक केल्याचे सांगितले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

दुसर्‍या गुन्ह्यांतील ५० वर्षांची तक्रारदार महिला ऋता समीत देशमुख या विलेपार्ले येथे राहतात. गेल्या २५ वर्षांपासून त्या विलेपार्ले येथील आरोग्यनिधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करतात. १२ जानेवारीला त्या हॉस्पिटलमधये होत्या. यावेळी त्यांना फेसबुकवर शेअर ट्रेडिंगसंदर्भात एक जाहिरात दिसली होती. तिथे व्हॉटअप ग्रुप जॉईन करण्यासाठी एक लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. त्यात ऍडमीन शेअरमार्केटसह शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देत होते. ग्रुपमधील अनेक सभासदांनी शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केली होती. त्यात त्यांना चांगला फायदा होत होता. याबाबतची माहिती ते सर्वजण व्हॉटअपवर टाकत होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनीही शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेत सुमारे पाच लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर ऋता देशमुख यांना चांगला फायदा झाल्याचे दिसून आले. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत ऍडमिनकडे विचारणा केली असता त्याने त्यांना सव्वाबारा लाखांची आणखीन गुंतवणुक किंवा त्यांच्याकडून कर्ज घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून त्यांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. त्यामुळे ऋता देशमुख यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या विशाल पवार याला डोंबिवली येथून पोलिसांनी अटक केली. तपासात त्याने सायबर ठगांना फसवणुकीसाठी त्याचे बँक खाते वापरण्यास दिले होते. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page