पुलवामा हल्ल्याशी संबंध जोडून अटकेच्या भीतीने व्यापार्याची फसवणुक
बोगस कंपनीच्या नावाने बँक खाती उघडून देणार्या पिता-पूत्राला अटक
अरुण सावरटकर
२२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – पुलवामा हल्ल्याशी संबंधित मुख्य आरोपी आदिल गौरीशी संबंध जोडून अटकेच्या भीतीने एका कापड व्यापार्याची २६ लाख ५० हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी पिता-पूत्राला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अतुल सुदाम गायकवाड (४८) आणि विनीत अतुल गायकवाड (२४) अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीसाठी गायकवाड पिता-पूत्राने बोगस कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून या खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या कंपनीत अतुलसह त्याची पत्नी आणि मुलगा संचालक असल्याचे दाखविण्यात आले होते.
धनेश रमनलाल शाह हे ५५ वर्षांचे तक्रारदार कापड व्यापारी असून सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा श्रद्धा गारमेंट नावाची कंपनी आहे. २७ ऑगस्टला त्यांना विशाल ठक्कर नावाच्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो सीआयडी विभागातून बोलत असून काश्मीरमध्ये त्यांच्याविरुद्ध एका गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुलवामा हल्ल्यातील मुख्य आरोपी आदिल गौरीने शंभरहून अधिक लोकांचे आधारकार्डचा वापर करुन सुमारे ९५ कोटीचा घोटाळा केला आहे. त्याच्या घरी केलेल्या कारवाईत त्यांच्या नावाचा आधारकार्ड सापडले होते. या आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडून त्यात सात कोटीचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. खाते उघडण्यासाठी त्यांना पाच लाखांसह पंधरा टक्के कमिशन मिळाल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांनी ते कुठल्याही आदिल गौरी नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही, त्यांचे काश्मीरमध्ये कुठल्या बँकेत खाते नाही.
या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याने त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होईल असे सांगितले. तपासात सहकार्य केल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही असे सांगून त्याने त्यांची चौकशी सुरु केली होती. त्यानंतर त्याने त्यांना व्हिडीओ कॉल करुन त्यांची चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान त्याने त्यांना कुटुंबियासह त्यांच्या बँक खाते, ज्वेलरी तसेच इतर गुंतवणुकीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही त्याला सर्व माहिती सांगितली. याच दरम्यान त्यांची रणबीर सिंग नावाच्या अन्य एका व्यक्तीने चौकशी सुरु केली होती.
चौकशीदरम्यान त्याने या संपूर्ण प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे नावे समोर आले आहे. या गुन्ह्यांत तुमचा काहीही संबंध नसल्याचे दिसून आले असून तुम्हाला आमच्याकडून सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी त्यांच्या बँक खात्यासह घरातील सोने विकून ती रक्कम एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले.
चौकशी पूर्ण होताच त्यांना ती रक्कम परत केली जाईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व सोने गहाण ठेवले होते. जवळपास २६ लाख ५० हजाराची कॅश त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्यापूर्वी त्यांना सर्वोच्च न्यायालयासह मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकार्यांचे स्वाक्षरी असलेले पत्र पाठविण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांची चौकशी बंद केली होती. चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांची रक्कम पुन्हा मिळेल असे सांगण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. याच दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राची अशाच प्रकारे अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे समजले होते.
त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार स्थानिक पोलिसांसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना सांगून संबंधित तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह खंडणी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला, तपासात ही रक्कम एका खाजगी बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ते बँक खाते अतुल गायकवाड यांचे होते. त्यांची माहिती काढताना या पथकाने अतुलसह त्यांचा मुलगा विनित गायकवाडला ताब्यात घेतले होते.
चौकशीत अतुलने त्याच्यासह त्याची पत्नी आणि मुलाच्या नावाने एका बोगस कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडले होते. या खात्याची माहिती त्याने सायबर ठगांना दिली होती. त्यानंतर या ठगाने फसवणुकीची रक्कम संबंधित् बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास धनेश शाह यांना प्रवृत्त केले होते. याकामी गायकवाड कुटुंबियांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. कंपनीचे बोगस खाते उघडून त्याचा वापर फसवणुकीसाठी दिल्याचे उघडकीस येताच अतुल गायकवाड आणि त्यांचा मुलगा विनित गायकवाड या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.