म्हाडा-एसआरए फ्लॅटच्या नावाने गंडा घालणारा मुख्य आरोपी गजाआड

फ्लॅटसाठी घेतलेल्या ५५ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – गोरेगाव येथील म्हाडा, चेंबूरच्या एसआरए फ्लॅटच्या नावाने एका महिलेला गंडा घातल्याप्ररकणी शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या मुख्य आरोपी विनोद बबन धोत्रे याला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली.फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत लक्ष्मण कचरु कोलते हा सहआरोपी असून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या ५५ लाख ५१ हजाराचा अपहार करुन तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याचा आरोप आहे.

ज्योती बाळकृष्ण मांडवकर ही महिला केअरटेकर म्हणून काम करत असून सध्या मालाडच्या एव्हरशाईन नगर परिसरात राहते. तिच्याच शेजारी गजाबाई ऊर्फ आप्पा ही महिला राहत असून ती घर खरेदी-विक्री तसेच भाड्याने देण्याचे इस्टेट एजंट म्हणून काम करते. डिसेंबर २०२३ रोजी तिने तिची विनोद धोत्रेशी ओळख करुन दिली होती. तो शिवसेनेचा पदाधिकारी असून तो गरीबांना नेहमीच मदत करत असल्याचे सांगितले होते. यावेळी तिने त्याला तिच्यासाठी स्वस्तात फ्लॅट असेल तर सांगण्याची विनंती केली होती. काही दिवसांनी विनोदने तिला कॉल करुन म्हाडाचा एक फ्लॅट असल्याचे सांगून तिला फ्लॅट पाहण्यासाठी कार पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर ती गजाबाईसोबत गोरेगाव येथील म्हाडा इमरातीमध्ये फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती.

सॅम्पल फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्याने तिला तोच फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता. त्यासाठी तिने तिच्या बँकेची २५ लाखांची एफडी मोडून, तिच्यासह तिचे आई आणि वहिनीच्या दागिन्यांची विक्री केली होती. त्यातून तिने ५५ लाख ५१ हजार रुपये जमा करुन ती रक्कम विजय धोत्रेला दिली होती. या पेमेंटनंतर त्यांच्यात गोरेगाव येथील तीन डोंगरी, म्हाडा इमारत क्रमांक तीन, ५०३ क्रमांकाच्या फ्लॅटचा एक करार झाला होता. जानेवारी २०२४ रोजी त्याने तिला फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्‍वासन दिले होते. हा फ्लॅट लक्ष्मण कोलते यांना म्हाडा लॉटरीमध्ये मिळाला होता, त्याच फ्लॅटचा त्याने लक्ष्मणच्या मदतीने तिला विक्री केली होती. ठरल्याप्रमाणे जानेवारी २०२४ रोजी त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही.

फ्लॅटमध्ये काम सुरु असल्याचे सांगून तो तिला टाळत होता. काही दिवसांनी त्याने तिला म्हाडा इमारतीच्या दिडशेहून अधिक फ्लॅट रद्द झाले असून त्यात तिचा फ्लॅटचाही समावेश होता. त्यानंतर तने तिला चेंबूर येथील सुमननगर येथे एसआरएचे काही फ्लॅट दाखविले. मात्र दिलेल्या त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला होता. काही दिवसांनी त्याने बोरिवली आणि जोगेश्‍वरीतील त्याच्या मालकीचे दोन व्यावसायिक गाळे देण्याचे आमिष दाखविले, मात्र त्यावेळेस त्याने त्याचे आश्‍वासन पाळले नाही. वेगवेगळे कारण सांगून तो पुन्हा तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. तिला प्रतिसाद देत नव्हता.

म्हाडासह एसआरए फ्लॅटच्या आमिषाने त्याने तिच्याकडून ५५ लाख ५१ हजार रुपये घेतले, मात्र दोन ते अडीच वर्ष उलटूनही त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे कंटाळून तिने विजयसोबतचा फ्लॅटचा करार रद्द केला आणि फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत करण्याची विनंती केली. त्याने तिला धनादेश दिले, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने विजय धोत्रे आणि लक्ष्मण कोलते या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या आठ महिन्यांपासून वॉण्टेड असलेला या कटातील मुख्य सूत्रधार आणि शिवसेनेचे पदाधिकरी विनोद धोत्रे याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत त्याने तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली असून फसवणुकीच्या रक्कमेची त्याने कशा प्रकारे विल्हेवाट लावली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page