मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शॉपिंगसाठी गेलेल्या व्यावसायिकाच्या कारमधील कॅश चोरी करुन पळून गेलेल्या कारचालकाला अखेर सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अल्ताफ शब्बीर अहमद असे या आरोपी चालकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची चौदा लाखांची कॅश हस्तगत केली आहे. चोरीच्याा याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
४६ वर्षांचे तक्रारदार इकलाख गफार डब्बावाला हे व्यावसायिक असून सांताक्रुज परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सांताक्रुज येथे त्यांच्या मालकीचे लकी मोटर्स नावाचे एक शोरुम आहे. नोव्हेबर महिन्यांत त्यांच्या मुलीचे लग्न ठरल्याने बुधवारी ७ ऑक्टोंबरला ते त्यांच्या फॅमिलीसोबत सांताक्रुज येथे कपड्याच्या खरेदीसाठी आले होते. यावेळी त्यांनी कारमध्ये कॅश ठेवली होती. कपड्याच्या दुकानात जाताना त्यांनी त्यांचा कारचालक अल्ताफ अहमद याला कॅशकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर ते सर्वजण माहीम येथील मकदुम बाबा दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते.
दर्शन घेऊन ते पुन्हा सांताक्रुज येथे शॉपिगसाठी आले होते. रात्री आठ वाजता ते शॉपिंग करुन कारजवळ आले होते. यावेळी त्यांना कारमध्ये अल्ताफ दिसला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कारमधील कॅश ठेवलेल्या बॅगेची पाहणी केली, मात्र कारमध्ये कॅशची बॅग नव्हती. हा प्रकार सिझन मॉलजवळ घडल्याने त्यांनी मॉलमधील काऊंटरवर तेथील सीसीटिव्ही फुटेज दाखविणयची विनंती केली. त्यांनी त्यांना मॉलसमोरील कार पार्किंगचे सीसीटिव्ही फुटेज दाखविले. त्यात त्यांचा कारचालक अल्ताफ अहमद हा कॅश असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले.
त्यानेच कॅश चोरी करुन पलायन केल्याचे उघडकीस येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अल्ताफ अहमद याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना अल्ताफला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची सर्व चौदा लाखांची कॅश हस्तगत केली आहे. अटकेनतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.