एसआरएच्या फ्लॅटसाठी गंडा घालणार्‍या मुख्य आरोपीस अटक

१४५ जणांना १.६२ कोटींना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मे २०२४
मुंबई, – चेंबूर, दादर आणि वरळी परिसरात एसआरए योजनेतर्ंगत स्वस्तात फ्लॅटचे गाजर दाखवून १४५ जणांना १ कोटी ६२ लाखांना गंडा घालणार्‍या एका मुख्य आरोपीस गजाआड करण्यात अखेर माहीम पोलिसांना यश आले आहे. प्रदीप महादेव नाईक असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रदीपने एसआरएच्या फ्लॅटच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अजीत महादेव पावसकर हे घाटकोपरच्या एस. जी बर्वे नगर, भटवाडीचे रहिवाशी असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा प्रदीप नाईक हा मित्र असून तो माहीम येथे राहतो. २००३ साली या दोघांची भेट झाली होती. या भेटीत त्याने त्यांना चेंबूरच्या सुमननगर आणि दादरच्या कवडीवाडी, पाटीलवाडी, वरळी येथे एसआरए योजनेतून अनेक गरीब लोकांना स्वस्तात फ्लॅट देणार आहे. त्यासाठी त्याने एक प्रोजेक्ट सुरु असून या प्रोजेक्टमुळे अनेक गरीब कुटुंबियांचे त्यांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. तीन वर्षांत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा त्याचा मानस असल्याचे सांगितले. या प्रोजेक्टची जास्तीत जास्त माहिती गरीब लोकांपर्यंत पोहचून त्यांना त्यात घर घेण्यास प्रवृत्त करण्याची जबाबदारी त्याने त्यांच्यावर सोपविली होती. तसेच त्यांनाही एक फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी घाटकोपर, दादर, भांडुप, मुलुंड आणि डोबिवलीतील त्यांच्या परिचित लोकांना प्रदीप नाईकच्या एसआरए प्रोजेक्ट माहिती सांगून त्यांना तिथे घर घेण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांच्या परिचित ४५ लोकांनी घरासाठी अर्ज केला होता. प्रदीपने चेंबूरच्या सुमननगर परिसरात असाच एक प्रोजेक्ट सुरु केल्याने २००३ ते २००८ या कालावधीत १४० हून अधिक लोकांनी तिथे फ्लॅट बुक करताना त्याला ७१ लाख रुपये तसेच तसेच दादरच्या कवडीवाडी, पाटीलवाडी आणि वरळीतील एसआरए प्रोजेक्टसाठी २०१४ ते २०१९ या कालावधीत ३३ लोकांनी ९४ लाख ४५ लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत प्रदीपने कोणालाही एसआर योजनेतर्ंगत फ्लॅट दिला नाही. फ्लॅटबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयतन करत होता. नंतर त्याने त्यांना भेटणेही बंद केले होते. त्यामुळे या सर्वांनी चेंबूरसह दादर आणि वरळीतील प्रोजेक्टची पाहणी केली होती. यावेळी तिथे एसआरए प्रोजेक्ट सुरु असल्याचे दिसून आले, मात्र त्याच्याशी प्रदीप नाईक याचा काहीही संबंध नव्हता.

अशा प्रकारे प्रदीपने एसआरए योजनेतर्ंगत स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून १४५ जणांकडून १ कोटी ६२ लाख रुपये घेतले, मात्र कोणालाही फ्लॅटचा ताबा न देता त्यांची फसवणुक केली होती. त्याने दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या घटनेनंतर अजीत पावसकर यांच्यासह विलास यादव, ऍलेक्स डिसुजा, सुनिल गायकवाड, विजय पावसकर, अशोक गणाणकर, भावेश शेट्टी, रत्नाकर शेट्टी, हरचरणसिंग संधू हितेश चिवीलकर, गुरुनाथ सामंत, अरुण ताठेले, अतिक रकवी, तेजस्वी खांडेकर, आशिष गावडे, अलका हांडे, मनोज बोरावडेकर, सुनिल पवार, शौकतभाई अशा १९ जणांनी माहीम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून प्रदीप नाईकविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान प्रदीप नाईक याने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर अजीत पावसकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रदीप नाईकविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या प्रदीप नाईक याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page