मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मे २०२४
मुंबई, – झटपट पैशांसाठी सोने तस्करी करणार्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचार्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी सुमारे अडीच कोटीचे सोने जप्त केले असून ते सोने त्याने एका बाटलीच्या आतून पेस्ट स्वरुपात लपवून ठेवले होते. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सीमा शुल्क विभागाकडे सोपविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय सोन्यासह ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढल्याने अशाच तस्कराविरुद्ध केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. तस्करीचे प्रकार होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात होती. विमानतळावरील एका खाजगी कंपनी आरोपी कामाला आहे. गुरुवारी सकाळी तो विमानतळावरुन बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. घाईघाईत जाताना त्याची हातातील स्टिलची बाटली खाली पडली. हा प्रकार संशयास्पद वाटताच सीआयएसएफच्या जवानांनी ती बाटली ताब्यात घेतली होती. यावेळी ती बाटली इतर बाटलीपेक्षा जड वाटत होती. त्यामुळे त्यांनी बाटली तपासणीसाठी स्कॅनिंग मशिनमध्ये टाकली होती. यावेळी त्यात काहीतरी संशयास्पद वस्तू लपविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संपूर्ण बाटलीची तपासणी केल्यानंतर या अधिकार्यांना त्यात या अधिकार्यांना सुमारे अडीच कोटीचे पेस्ट स्वरुपातील सोने सापडले. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी या कर्मचार्याला अटक करुन त्याला पुढील चौकशीसाठी सीमा शुल्क विभागाकडे सोपविण्यात आले होते. त्याला ते सोने कोणी दिले, त्याने यापूर्वीही सोन्याची तस्करी केली का, याकामी त्याला किती रुपयांचे कमिशन मिळाले होते याची चौकशी करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.