चांगला परतावा देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणुक
७० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – कन्स्ट्रक्शन कंपनीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका महिलेची मायलेकानी सुमारे ७० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी आरोपी मायलेकाविरुद्ध फसवणुकीसह अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. अलिफा काचवाला आणि हुसैन काचवाला अशी या दोघांची नावे असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे गुंतवणुकीच्या नावाने इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
फातेमा हाकीमउद्दीन भानापुरवाला ही महिला वांद्रे येथील भारतनगर परिसरात एकटी राहते. तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला असून ती सध्या वरळीतील एका शाळेत नोकरी करते. तिची मुलगी जुमाना (सध्या ती हयात नाही) ही लालबाग येथे राहणार्या अलीफा काचवाला हिच्याकडे खाजगी शिकवणीसाठी जात होती. त्यामुळे तिचे तिच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनेकदा ते कौटुंबिकसह व्यवसायासंदर्भात चर्चा करत होते. याच दरम्यान अलिफाने तिचा जगदीश कालवे नावाचा परिचित मित्र असून त्याची मरिनड्राईव्ह येथे साई कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीत ती भागीदार असून तिने त्याच्या कंपनीत काही रक्कम गुंतवणुक केली आहे. या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे तिने तिला तिथे गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. चांगला परवतावा मिळत असल्याने तसेच अलिफावर विश्वास ठेवून तिने तिच्याकडे गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. तिनेही तिला दुप्पट रक्कम देऊन तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
२०१७ साली अलिफा व तिचा मुलगा हुसैन हे दोघेही तिच्या वांद्रे येथील राहत्या घरी आले होते. यावेळी त्यांनी तिला मोठी रक्कम रक्कम गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मोठ्या रक्कमेची गुंतवणुक केल्यास तिला जास्त पैसे मिळतील असे सांगितले. त्यामुळे तिने त्यांच्या सांगण्यावरुन २०१७ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत त्यांच्याकडे टप्याटप्याने सुमारे ७० लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत तिने तिला मुद्दल रक्कमेसह व्याजाची रक्कम दिली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर अलिफा आणि हुसैन हे दोघेही तिला टाळण्याचा प्रयत्न करत होते. तिचे कॉल घेणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने मरिनड्राईव्ह येथे जगदीश कालवे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी अलिफा आणि हुसैन यांनी त्यांच्याकडे कुठलीही रक्कम गुंतवणुकीसाठी दिली नसल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने या दोघांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी तिला पैसे देण्याचे आश्वासन देत तिला काही धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी तिला पैसे परत मिळणार नाही, तुला जे करायचे ते कर अशी धमकी दिली होती. या मायलेकाकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच फातेमा भानापुरवाला हिने बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अलिफा काचवाला आणि हुसैन काचवाला या दोन्ही मायलेकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.