मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मे २०२४
मुंबई, – दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिपसाठी घेतलेल्या २० लाख ४१ हजार रुपयांचा अपहार करुन नऊजणांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तेजस महेंद्र शहा या पूर्वा हॉलिडेज कंपनीच्या ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तेजसने अशाच प्रकारे इतर काही लोकांचे ट्रिप आयोजित करुन त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचे बोलले जाते.
४६ वर्षांचे जेसल देवेंद्र शहा हे कांदिवली परिसरात राहत असून ते एका खाजगी सॉफ्टवेअर कंपनी महाव्यवस्थापक पदावर काम करतात. त्यांना भारतासह विदेशात पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करण्याची आवड आहे. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वार्षिक सुट्ट्यामध्ये अशा विविध ठिकाणी जातात. त्यात त्यांचे मित्र आणि परिचित नातेवाईकांचाही समावेश असतो. गेल्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. शहा कुटुंबिय जैन असल्याने त्यांना जेवणासह इतर सर्व सोयी असलेली ट्रिप ऍरेज करायची होती. त्यासाठी ते ट्रॅव्हेल्स कंपनीची माहिती काढत होते. यावेळी त्यांना पूर्वा हॉलिडेज या कंपनीची माहिती मिळाली होती. डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी कंपनीचे मालक तेजस शहाला मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या दक्षिण आफ्रिकेच्या बारा दिवस आणि तेरा रात्रीची माहिती देताना जेवणासह विमानाचे येण्या-जाण्याचे तिकिट, हॉटेल आणि ट्रिपमधील इतर ऍक्टिव्हीटीचा समावेशाबाबत सांगितले होते. दुसर्या दिवशी तेजसने त्यांना ट्रिपच्या पॅकेजची माहिती दिली होती. या पॅकेजनंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह नऊजणांचे बुकींग केले होते. त्यासाठी त्यांनी त्याला २० लाख ४१ हजार ५०० रुपयांचे पेमेंट केले होते.
मार्च महिन्यांत त्यांनी तेजसला ट्रिपबाबत विचारणा केली असता त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तो उडवाउडवाचे उत्तरे देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कार्यालयात जाऊन पाहणी केल्यानंतर तेजसने त्याचे कार्यालय बंद करुन पलायन केल्याचे दिसून आले. १० एप्रिलला संपर्क झाल्यानंतर त्यांनी तेजसकडे ट्रिप रद्द करुन ट्रिपसाठी घेतलेल्या पैशांची मागणी केली होती. यावेळी त्याने पैसे देण्याचे आश्वासन दिले, मात्र पैसे परत केले नाही. अशा प्रकारे तेजसने दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिपसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन जेसल शहा व इतर नऊजणांची फसवणुक करुन पलायन केले होते. या घटनेनंतर त्यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तेजस शहाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात तेजसविरुद्ध अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वीही पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केल्याचे बोलले जाते.