चौदा कोटीच्या फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा
मालाचे पेमेंट न करता पैशांचा अपहार करुन व्यावसायिकाची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – सुमारे चौदा कोटीच्या फसवणुप्रकरणी केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे दोन्ही मालक हितेन खटाव, रोहन खटाव व इतर पदाधिकार्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपींवर मालाचे पेमेंट न करता पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
विजय प्रमोद कारिया हे व्यावसायिक असून एका खाजगी कंपनीत अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील एमआयडीसी परिसरात आहे. इलेक्ट्रीक केबल वायर, पॉवर साहित्य, सोलर पॉवर जनरेटींग डिव्हाईस आणि अन्य उत्पादन आणि पुरवठादार कंपनी म्हणून ही कंपनी मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना या क्षेत्राशी संबंधित असलेली केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया नावाची एक कंपनी तोट्यात असून कंपनीने त्यांच्या नाशिक, सिन्नर व एमआयडीसी मालेगावातील प्लँट बंद झाल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी ही कंपनी टेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांचे संबंधित कंपनीचे मालक हितेन खटाव आणि रोहन खटाव यांच्याशी चर्चा सुरु होती. कंपनी बंद पडल्याने त्यांनी विविध कंपन्यांकडून घेतलेल्या ऑर्डरचा पुरवठा केला नव्हता. याबाबत संबंधित कंपनीने त्यांना कायदेशीर नोटीस बजाविली होती.
या संपूर्ण ऑर्डर पूर्ण करण्यासाठी खटाव यांच्या कंपनीने त्यांच्याकडे पंधरा कोटीची मागणी केली होती. जुन्या आणि प्रलंबित ऑर्डर पूर्ण केल्यानंतर त्यातून त्यांना ३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीकडे त्यांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काही माल देण्याची विनंती केली होती. मालाचे पेमेंट आल्यानंतर त्यांना त्यांची रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. खटाव यांच्यावर विश्वास ठेवून, तोट्यात चाललेल्या कंपनीला बाहेर काढण्याच्या उद्देशाने त्यांच्या कंपनीने त्यांच्या केबल कार्पोरेशन ऑफ इंडियाला फेब्रुवारी ते जून २०२२ या कालावधीत सुमारे चौदा कोटीचा माल पाठविला होता. तसेच त्यांच्या कंपनीला सुमारे ८० लाख रुपयांचे केबल जोडणी आणि सुपरव्हिजन सर्व्हिसचा पुरवठा केला होता. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांचे पेमेंट केले नव्हते. समोरच्या कंपनीकडून पेमेंट आल्यानंतर आपण तुमच्या कंपनीचे पेमेंट करु असे खटाव मालकाकडून सांगण्यात येत होते. मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पूर्ण न केल्याने विजय कारिया यांच्या कंपनीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर करण्यात आली होती. या याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे.
दुसरीकडे खटाव मालकाकडून फसवणुक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर विजय कारिया यांनी एमआयडीसी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हितेन खटाव, रोहन खटाव यांच्यासह केबल कार्पोरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकार्याविरुद्ध पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच कंपनीच्या दोन्ही मालकासह इतर पदाधिकार्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.