लैगिंक अत्याचारप्रकरणी २७ वर्षांच्या प्रियकराला अटक
लग्नाच्या आमिषाने अत्याचार करुन गर्भपात प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मे २०२४
मुंबई, – लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका २७ वर्षांच्या आरोपी प्रियकराला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. नजीर रईस अहमद खान ऊर्फ शाहरुख असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर लैगिंक अत्याचार करुन एका २६ वर्षांच्या तरुणीला गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने बुधवार ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत २६ वर्षांची तरुणी ही नालासोपारा येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तीन वर्षांपूर्वी ती जोगेश्वरी परिसरात राहत होती. याच दरम्यान तिची नजीरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही दिवसांनी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिनेही त्यास होकार दिला. त्यानंतर तो तिला सतत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याच कालावधीत त्याने तिच्यावर जोगेश्वरी आणि नालासोपारा येथे अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. नजीर हा तिच्याशी लग्न करणार असल्याने तिनेही त्याला विरोध केला नव्हता. काही महिन्यांपूर्वी तिला ती गरोदर असल्याचे समजले होते. ही माहिती तिने त्याला सांगून लग्नाविषयी विचारणा केली होती. यावेळी त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार देत तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केले होते. तसेच त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यास त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तो मुंबईतून त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी पळून गेला होता. रईसने लग्नाच्या आमिषाने केवळ शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केला होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचार करुन गर्भपात करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रईसला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.