हत्येच्या गुन्ह्यांत जन्मठेप झालेल्या वॉण्टेड आरोपीस अटक
तीन वर्षापूर्वी पॅरोलवर बाहेर आल्यानतर पळून गेला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मे २०२४
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत जन्मठेप झालेल्या एका वॉण्टेड आरोपीस कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. राहुल अशोक शार्दुल असे या ४० वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला कल्याण तालुका पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर राहुल हा पळून गेला होता, त्यामुळे त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. अखेर तीन वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
राहुल हा टिटवाळा येथील मांडागाव, कविरा अपार्टमेंटमध्ये राहत होता. अकरा वर्षापूर्वी राहुलविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात दंगल घडवून हत्या केल्याप्रकरणी एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केल्यानंतर या खटल्याची नियमित सुनावणी झाली होती. ही सुनावणी संपल्यानंतर कोर्टाने त्याला हत्येसह अन्य कलमांतर्गत दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शिक्षा होताच त्याला अमरावती मध्यवती कारागृहात पाठविण्यात आले होते. तिथेच तो त्याची शिक्षा भोगत होता. मात्र कोरोना काळात काही आरोपींना पॅरोलवर सोडून देण्यात आले होते. त्यात राहुलचा समावेश होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर त्याला कारागृहात जाणे बंधनकारक होते, मात्र तो कारागृहात न जाता पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच कारागृहातील कर्मचार्यांच्या तक्रारीवरुन राहुलविरुद्ध २२४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना राहुल हा टिटवाळा येथील भोईर गावात येणार असल्याची माहितीगुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून राहुलला अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कल्याण तालुका पोलिसाकडे सोपविण्यात आले होते. पॅरोलवर सुटल्यानंतर राहुल हा गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. अटकेच्या भीतीने तो एकाच ठिकाणी राहत नव्हता. स्वतचे अस्तित्व बदलून तो वेगवेगळ्या नावाने राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.