शहरातील प्रतिष्ठित बिल्डरला १५ कोटीच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी
छोटा शकीलच्या नावाचा वापर करुन अज्ञात व्यक्तीकडून कॉलसह मॅसेजचा वापर
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – शहरातील एका प्रतिष्ठित बिल्डरला १५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाचा वापर करुन अज्ञात व्यक्तीकडून कॉलसह मॅसेजद्वारे ही धमकी दिली जात असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने बोलताना सांगितले. याप्रकरणी आरे पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक करत आहेत.
यातील तक्रारदार शहरातील एका प्रतिष्ठित बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांची एक बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनी असून या कंपनीत त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्र पार्टनर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीचे अंधेरीतील वर्सोवा, वांद्रे, मालाड, बीकेसी, कालिना परिसरात बांधकाम साईट सुरु आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची कालिना येथील जागेच्या संदर्भात मालकाशी चर्चा झाली होती. त्यांच्यात विकासाबाबत एक करार झाला होता. त्यानंतर या जागेवरील अतिक्रमण केलेली जागा महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी तोडून टाकले होते. तिथे एक बार होते. या अनधिकृत बारची तोडफोड केल्यानंतर त्यांचे संबंधित् बारचा मालक मोहनदास शेट्टी, स्थानिक केबलचालक मुस्तफा केबलवाला आणि स्थानिक रहिवाशी अक्रम खान यांच्यासोबत वाद होते. जागेवरील अतिक्रमण हटविल्यानंतर मे २०२३ रोजी त्यांनी बांधकामासाठी असलेले सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. त्यानंतर कंपनीने बीकेसी येथील बांधकाम सुरु केले होते.
१८ नोव्हेंबर २०२३ रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका व्हॉटअप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. समोरील व्यक्तीने तो शकीलभाई बोलत असून त्यांच्याकडे पोट्रेक्शन मनी म्हणून २५ कोटीची खंडणीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे घाबरुन त्यांनी फोन कट केला होता. त्यानंतर त्यांना विविध मोबाईलसह व्हॉटअप क्रमांकावरुन खंडणीसाठी धमकी दिली जात होती. सतत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी होत होती. या धमकीने त्यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबिय प्रचंड घाबरले होते. भीतीपोटी त्यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या दोन्ही पार्टनरशी खंडणीच्या धमकीबाबत चर्चा केली होती. यावेळी त्यांनी त्यांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे पोलिसांनी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर १३ जानेवारीला त्यांना पुन्हा अज्ञात मोबाईलवरुन जिवे मारण्याचा एक मॅसेज आला होता. पोलिसांत तक्रार केली ना, आम्हाला काहीच फरक पडत नाही. २५ कोटी दिले नाहीतर २५ गोळ्या घालू असे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांना अशाच प्रकारे सतत धमकीचे मॅसेज येत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने २० फेब्रुवारीला नेपाळला येण्यास सांगितले. तिथेच आपण सर्व मॅटर सेटल करु असे सांगितले होते. मॅसेजमध्ये तसेच संभाषणादरम्यान संबंधित व्यक्ती सतत छोटा शकीलचे नाव घेऊन तो त्याचा खास हस्तक असल्याचे सांगत होता. भाई को पोट्रेक्शन मनी नही दिया तो तेरा गेम होना तय है असे त्याने धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी आरे पोलिसांत पुन्हा खंडणीसाठी धमकी येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
एका प्रतिष्ठित बिल्डरला छोटा शकीलच्या नावाने धमकी मिळाल्याने इतर बिल्डरांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेसह खंडणी विरोधी पथकाला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांची माहिती आरे पोलिसांकडून घेण्यात आली असून पोलिसांनी संमातर तपासाला सुरुवात केल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.