कारवाईची भीती दाखवून साडेआठ लाखांची फसवणुक

सायबर गुन्ह्यांतील दुकलीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – मुंबईहून इराणला पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, एमडी ड्रग्जसहीत इतर वस्तू पाठविल्याप्रकरणी मनी लॉड्रिंगची तक्रार प्राप्त झाली असून कारवाईची भीती दाखवून एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याची सुमारे साडेआठ लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी दोन सायबर ठगांना वनराई पोलिसांनी अटक केली. प्रविण बाबासाहेब कोकणे आणि संतोष नागनाथ देडे अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मनिष पुखराज बाफना हे बोरिवलीतील दौलतनगर, लक्ष्मी महल सोसायटीमध्ये राहत असून ते गोरेगावच्या एका खाजगी कंपनीत टेक्निकल डायरेक्टर म्हणून कामााला आहेत. ७ मार्चा ते त्यांच्या गोरेगाव येथील कार्यालयात काम करत होते. याच दरम्यान त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो फेडॅक्स कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे पार्सल रिटर्न आले आहे. ते पार्सल मुंबईहून इराणला जाणार होते. त्यात पाच किलो कपडे, दोन क्रेडिट कार्ड, एक लॅपटॉप, पाच पासपोर्ट आणि ७५० ग्रॅम एमडी ड्रग्ज होते. ते पार्सल तुमच्या नावाने पाठविण्यात आल्याचे सांगून कस्टमने पार्सल जप्त केले आहे. त्यांच्या वतीने स्थानिक पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांचा कॉल त्याचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप सावंत यांच्याकडे ट्रान्स्फर केला होता. यावेळी प्रदीप सावंतने तो सायबर क्राईम ब्रॅचमधून बोलत असल्याचे सांगून त्यांना त्यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे. जर ते पार्सल तुमचे नसेल तर तुम्ही पोलिसांत क्रॉस तक्रार करु शकता. त्यानंतर त्याने त्यांना स्काय ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्या ग्रुपमध्ये ऍड केले होते. त्यानंतर या व्यक्तीने त्यांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्या तक्रारीची सविस्तर माहिती सांगितली. हा मनी लॉड्रिंगचा गुन्हा आहे. याच गुन्ह्यांत मोहम्मद इस्माईल मलिक याला अटक झाली असून त्याने त्यांच्या नावावर तीन बँक अकाऊंट उघडले होते. सध्या या गुन्ह्यांचा तपास डीसीपी मिलिंद भामरे यांच्याकडे आहेत. त्यानंतर प्रदीपने त्यांचे बोलणे मिलिंद भामरेशी करुन दिले होते. त्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना व्हेरीफिकेशनसाठी काही पैसे एका बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांनी संबंधित बँक खात्यात ८ लाख ५७ हजार ९०८ रुपये ट्रान्स्फर केले. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा केली जाईल असे सांगण्यात आले होते, मात्र बराच वेळ होऊन त्यांनी ती रक्कम परत पाठविली नाही.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वनराई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित तोतया पोलीस अधिकार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी तपास करत होते. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रविण कोकणे आणि सतोष देडे या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यांनी सायबर ठगासाठी बोगस बँक खाते उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले. याकामी त्यांना काही ठराविक रक्कम मिळाले होते. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकार्‍यांचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page