आजारामुळे आलेल्या नैराश्यातून नायर रुग्णालयाच्या कर्मचार्याची आत्महत्या
निवासी इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – स्किझोफ्रेनिया या आजारामुळे आलेल्या नैराश्यातून नायर हॉस्पिटलच्या नोंदणी सहाय्यक कर्मचार्याने सोमवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहित किशोर गुरभानी असे या कर्मचार्याचे नाव असून त्याने एका निवासी इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले. रोहितने इमारतीवरुन आत्महत्या केल्याचा एक व्हिडीओच सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता मुंबई सेंट्रल येथील नायर रोड, वॉक्हार्ट हॉस्पिटलसमोरील पुष्पराज इमारतीमध्ये घडली. याच इमारतीमध्ये रोहित हा राहत होता. सध्या तो नायर हॉस्पिटलमध्ये नोंदणी सहाय्यक म्हणून कामाला होता. त्याला स्किझोफ्रेनिया हा आजार होता. गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो या आजाराने त्रस्त असल्याने त्याच्यावर एका खाजगी डॉक्टरकडून मानपोपचार सुरु होते. मात्र त्यातून त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. आजारामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून तो सायंकाळी पुष्पराज इमारतीच्या टेरेसवर गेला आणि तेथून त्याने उडी घेतली होती. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी ही माहिती आग्रीपाडा पोलिसांना दिली. रोहितला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र आजारामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी एडीआरची नोंद करुन ही माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविली आहे.