फ्लॅटचे बोगस अलोटमेंट देऊन महिलेची फसवणुक

२३ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी इस्टेट एजंटविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – फ्लॅटचे बोगस अलोटमेंट देऊन एका महिलेची इस्टेट एजंटने सुमारे २३ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकबरअली अक्रमअली सय्यद या एजंटविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.

संध्या अवधेश ओझा ही महिला अंधेरीतील न्यू म्हाडा कॉलनी, पूनमनगरात राहत असून तिचे पती मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे. याच परिसरात अकबरअली हा इस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्याचे अंधेरीतील महाकाली गुंफा, शकील निवासमध्ये कार्यालय आहे. दहा वर्षांपूर्वी संध्या ही नवीन घराच्या शोधात होती. तिने त्याच्याकडे फ्लॅटबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने वांद्रे येथील बीकेसी, पत्थरनगर झोपडपट्टी तोडून तिथे एसआरएची एक इमारत होणार आहे. या एसआरए इमारतीचे काम एचडीआयएल बिल्डरला देण्यात आले असून स्थानिक रहिवाशांना कुर्ला येथील ट्रान्झिंट कॅम्पमध्ये हलविण्यात आले आहे. तिथे त्यांना एक तात्पुरते घर देतो आणि नंतर एसआरएचा फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे तिने त्याला एसआरए फ्लॅटसाठी मार्च ते डिसेंबर २०१६ या कालावधीत २३ लाख ४० हजार रुपये दिले होते. यावेळी त्याने त्यांना पैसे मिळाल्याची पावती दिली हेती. याच दरम्यान त्याने दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर असलेला फ्लॅट तिच्यावर केल्याचे बोगस दस्तावेज बनविले होते. २०२० रोजी त्याने तिच्या नावावर बिल्डरने फ्लॅट अलोट केल्याचे पत्र दिले, त्यामुळे तिला त्याच्यावर विश्‍वास बसला होता.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो तिला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे तिने एचडीआयएल बिल्डरच्या कार्यालयात जाऊन तिच्या फ्लॅटबाबत चौकशी केली असता तिच्या नावावर कुठलाही फ्लॅट अलोट झाला नव्हता. तिच्याकडे असलेले फ्लॅटचे अलोटमेंट लेटर बोगस असल्याचे संबंधित कर्मचार्‍याने सांगितले. त्यामुळे तिने अकबरअलीकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने फ्लॅट न देता तिला दुसरीकडे फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले. त्याने तिला दोन-तीन फ्लॅट दाखविले. मात्र त्यापैकी कुठल्याही फ्लॅटचा ताबा दिला नाही. दोन वर्षापूर्वी तो त्याच्या घरासह कार्यालय सोडून पळून गेला होता. अशा प्रकारे त्याने पत्थरनगर येथील एसआरए इमारतीमध्ये फ्लॅटचे आमिष दाखवून त्याने तिच्याकडून घेतलेल्या २३ लाख ४० हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अकबरअली सय्यदविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page