मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – विक्रोळीतील एका निवासी इमारतीमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा विक्रोळी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मेघा नावाच्या एका महिलेस पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांची सुटका करुन दोघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. मेघाविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत नंतर तिला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
विक्रोळीतील कन्नमवारनगर, इंद्रधनुष्य इमारत क्रमांक सात नावाची एक निवासी इमारत असून याच इमारतीत मेघा राहते. ती तिच्या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवते. ग्राहकांच्या मागणीनुसार ती काही तरुणीसह महिलांना त्यांच्यासोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती विक्रोळी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने तिला संपर्क साधून तिच्याकडे काही महिलांची मागणी केली होती. यावेळी तिने प्रत्येक महिलेमागे तीन हजार रुपये आणि घरभाडे म्हणून पाचशे रुपयांची मागणी केली होती. ग्राहकाने होकार दर्शविल्यानंतर तिने त्याला तिच्या राहत्या घरी बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी बोगस ग्राहक तिच्या घरी गेला होता. तिथे त्यांच्यात पैशांचा व्यवहार सुरु असताना पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश इंगळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीता मराठे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, महिला हवालदार सावंत, महिला पोलीस शिपाई नाचरे, पोलीस हवालदार पाटील, काटकर, पोलीस शिपाई ठाकूर, मोटे यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी मेघा ही तिच्या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस येताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या घरात पोलिसांना दोन बळीत महिला सापडल्या. चौकशीदरम्यान या दोन्ही महिलांनी त्या मेघासाठी ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी जात असल्याची कबुली देताना याकामासाठी तिच्याकडून त्यांना कमिशन मिळत असल्याचे सांगितले. या कबुलीनंतर मेघाविरुद्ध पोलिसांनी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. बळीत दोन्ही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.