गुंतवणुकीच्या नावाने एकाच कुटुंबातील तिघांची फसवणुक
५० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – गुंतवणुकीवर अल्पावधीत चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून एका खाजगी कंपनीच्या संचालकासह अधिकार्यांनी एकाच कुटुंबातील तिघांची सुमारे ५० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन आंबोली पोलिसांनी कंपनीच्या सात संचालकासह अधिकार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा सोनावणे, निरज खंडेलवाल, साईकेट चॅटर्जी, अक्षय देसाई, सुभाष त्रिवेदी, सम्राट आणि रजत देशमुख अशी या सातजणांची नावे आहेत. सप्टेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत ही फसवणुक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
तक्रारदार महला स्मिता समीर राणे ही महिला कांदिवलीतील एस. व्ही रोड, हिरानंदानी हेरिटेज, रिबोना अपार्टमेंटमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहते. गेल्या वर्षी तिची ओळख आरोपींशी झाली होती. अंधेरीतील ओशिवरा परिसरात ऍग्रीओ ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून याच कंपनीत संबंधित सर्व आरोपी संचालकासह वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. ही कंपनीत ट्रेडिंग व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी तिला कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. कंपनीत ५० लाखांची गुंतवणुक केल्यास काही दिवसांत २५ लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. या आमिषाला बळी पडून स्मिता राणेसह तिची बहिण निता प्रमोद कन्नन आणि आत्तेभाऊ भरत मोळावडे यांनी कंपनीत ५० लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला व्याजासहीत ७५ लाख रुपये दिले नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही. गुंतवणुकीच्या नावाने या सातजणांनी तिच्यासह तिच्या बहिण आणि आत्तेभावाची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सातही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कृष्णा सोनावणे, निरज खंडेलवाल, साईकेट चॅटर्जी, अक्षय देसाई, सुभाष त्रिवेदी, सम्राट आणि रजत देशमुख यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सातही आरोपी पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे इतर काही व्यक्तींना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.