मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – शिवडी येथून एका २४ वर्षांच्या तरुणाला वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक करुन त्याच्याकडून सुमारे २० लाख रुपयांचा शंभर ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्यांचे नाव समोर आले असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.
शिवडी परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी रात्री तिथे आलेल्या एका २४ तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना शंभर ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चालू वर्षांत ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी एकूण २५ गुन्हे दाखल केले असून त्यात ६६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३४ किलो ८०० ग्रॅम वजनाचे विविध ड्रग्ज आणि १२०० कोडेनमिश्रीत कफ सिरप बॉटल असा ३२ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमडी ड्रग्जप्रकरणी १७ गुन्हे दाखल करुन त्यात ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ किलो ८०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत २३ कोटी ४४ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.