प्रियकरासह मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

प्रियकरासह मित्राविरुद्ध गुन्हा दाखल तर मित्राला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – प्रियकरासह सोशल मिडीयावर ओळख झालेल्या तरुणाकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून मानसिक नैराश्यात असलेल्या एका २४ वर्षांच्या तरुणीने आपल्या राहत्या निवासी इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकर सुरज आचार्य आणि मित्र करण रावल यांच्याविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत मित्र करण प्रविण रावलला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच तरुणीच्या प्रियकराची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

४९ वर्षांचे तक्रारदार जोगेश्‍वरी येथे राहत असून त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. त्यांची २४ वर्षांची मुलगी दिव्या ही बीकॉम झाली असून ती घरात खाजगी शिकवणी घेते तर मुलगा सिद्धार्थ हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ऑक्टोंबर २०२३ रोजी दिव्याने तिच्या आईला तिचे बोरिवली येथे राहणार्‍या सुरज आचार्य या तरुणासोबत मैत्री असूनते दोघेही लग्न करणार असल्याचे सांगितले. याच दरम्यान तिची सोशल मिडीयावर करण रावल या तरुणाशी ओळख झाली होती. तो ओळखीनंतर करण तिला भेटण्यासाठी सतत दबाव आणत होता. मात्र ती त्याला भेटण्यास टाळत होती. त्यामुळे करण तिच्या घराजवळील इमारतीखाली येऊन तिचा त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. भेटल्यानंतर तिला शिवीगाळ करुन मारहाण करायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु होते. याबाबत तिने तिच्या पालकांना सांगितले होते, तिच्या वडिलांनी करणला फोनवरुन समजाविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने त्यांच्याशी उद्धट वर्तन करुन दिव्याला सुखाने जगू देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर तो तिला सतत कॉल करत होता, मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. तिने तिचे सुरजसोबत प्रेम असून ते दोघेही लग्न करणार असल्याचे सांगूनही तो तिला धमकी देत होता. सुरजशी संबंध ठेवल्यास तिला जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे दिव्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला, मात्र बदनामीच्या भीतीने दिव्याने पोलिसात तक्रार करण्यास विरोध केला.

दुसरीकडे ही माहिती सुरजला समजताच तो तिच्यावर संशय घेत होता. गेल्याच आठवड्यात करणने तिला फोन करुन तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. एकीकडे करण तिच्याकडे पैशंांसाठी दबाव आणत होता तर दुसरीकडे सुरज तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी देत होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयुष्यात घडत असलेल्या या घडामोडीनंतर ती मानसिक तणावात होता. त्यातून तिने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता तिच्या राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेतली होती. हा प्रकार सायंकाळी तिच्या पालकांना समताच त्यांनी तिला तातडीने जवळच्या कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. ही माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी दिव्याच्या वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या मुलीच्या आत्महत्येला सुरज आचार्य आणि करण रावल हेच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांनी या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सुरज आणि करण यांच्याविरुद्ध दिव्याला मानसिक व शारीरिक शोषण देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी करण रावलला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page