चालत्या रिक्षात अश्लील चाळे करुन महिलेचा विनयभंग
प्रसंगावधान दाखवून महिलेने रिक्षातून उडी घेतली बोरिवलीतील घटना; रिक्षाचालकासह दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – कामावर जाण्यासाठी शेअर रिक्षातून प्रवास करताना सहप्रवाशाने अश्लील चाळे करुन एका २९ वर्षांच्या महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. प्रसंगावधान दाखवून या महिलेने चालत्या रिक्षातून उडी घेतल्याने तिला किरकोळ दुखापत झाली होती. याप्रकरणी विनयभंगासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रिक्षाचालकासह दोघांना सहा तासांत बोरिवली पोलिसांनी गजाआड केले. संजीव छतू राम आणि धीरजकुमार अयोध्याप्रसाद तिवारी अशी या दोघांची नावे असून यातील धीरजकुमारविरुद्ध सोळा वर्षांपूर्वी एक हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.
२९ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवलीतील पोईसर परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत आहे. सकाळी साडेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे घरातून कामासाठी निघाली होती. शेअर रिक्षातून प्रवास करताना तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र काही वेळाने त्याने तिचा हात पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. बोरिवलीतील एस. व्ही रोड, साईबाबानगर सिग्नलजवळ रिक्षा येताच तिने प्रसंगावधान दाखवून चालत्या रिक्षातून उडी घेतली होती. त्यात तिला किरकोळ दुखापत झाली होती. या घटनेनंतर तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध ३५४, ३४१, ४०३, ११४, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. लेडी फातिमा रिक्षा स्टॅण्ड पोईसर ते बोरिवलीतील एस. व्ही रोड, साईबाबानगर सिग्नल परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन अवघ्या सहा तासांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेश कदम, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी संजीव राम आणि धीरजकुमार तिवारी या दोघांनाही कोहीनूर शॉपसमोरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पोलिसांनी अटक केली.
तपासात दोन्ही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून सध्या कांदिवलीतील पोईसर आणि ९० फिट रोडवर भाड्याच्या रुममध्ये राहतात. ते दोघेही रिक्षाचालक म्हणून काम करतात. यातील धीरजकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सोळा वर्षांपूर्वी त्याने अनिल झा या व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. संजीवची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून त्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.