घरफोडीच्या तीन गुन्ह्यांत साडेनऊ लाखांची लूट

अंधेरी-सांताक्रुज येथील घटना; तीन गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – घरफोडीच्या तीन गुन्ह्यांत अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटमध्ये प्रवेश करुन कपाटातील सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. अंधेरी-सांताक्रुज परिसरात या तिन्ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जुहू आणि वाकोला पोलिसांनी तीन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.

५९ वर्षांचे दयानंद व्यकंटेश शेनॉय हे अंधेरीतील लल्लभाई पार्क, रघुकुल इमारतीमध्ये राहतात. दयानंद व त्यांची पत्नी दिपा हे दोघेही एका बँकिंग क्षेत्राशी कंपनीत कामाला आहे तर त्यांचा मुलगा फिजिओ थेरपिस्ट म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान ते तिघेही कामानिमित्त बाहेर होते. सायंकाळी पाच वाजता घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. आत जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटातील कॅश, सोन्याचे विविध दागिने आणि पॅनकार्ड, मतदान ओळखपत्रासह इतर कागदपत्रे असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जुहू पोलिसांना ही माहिती दिली होती.

दुसर्‍या घटनेत अज्ञात चोरट्याने सुमारे चार लाखांचा मुद्देमाल चोरी केला. सुभाष इंद्रकुमार पात्रा हे ६२ वर्षांचे वयोवृद्ध सांताक्रुज येथील शास्त्रीनगर, रिझवी इमारतीमध्ये राहतात. त्यांचा चर्नीरोड येथे वाहनाचे स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे तर त्यांची पत्नी एका खाजगी कंपनीत कामाला आहे. बुधवारी ८ मेला ते दोघेही त्यांच्या कामावर निघून गेले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि कॅश असा चार लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. रात्री दहा वाजता हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. अशीच अन्य घटना सांताक्रुज येथील कालिना परिसरात घडली. राहुल अशोक पवार हा एअर इंडियाचा कर्मचारी असून १ मे ते ८ मे २०२४ या कालावधीत तो त्याच्या कुटुंबियासोबत गावी गेला होता. यावेळी त्याच्या घरात प्रवेश करुन चोरट्याने सुमारे दिड लाखांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page