बँकेने लिलावाद्वारे विक्री केलेल्या फ्लॅटची ३० लाखांमध्ये परस्पर विक्री

फसवणुकीप्रकरणी महिलेस अटक तर पतीसह दिराचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बँकेने लिलावाद्वारे विक्री केलेल्या फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून सुमारे तीस लाखांमध्ये पुन्हा विक्री करुन एका वयोवृद्ध सीएची फसवणुक केल्याप्रकरणी अंजली सिद्धार्थ जाजू या आरोपी महिलेस बोरिवली पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत तिचा पती सिद्धार्थ बन्सीलाल जाजू आणि दिर सुबोध बन्सीलाल जाजू हे दोघेही सहआरोपी असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले. बँकेने त्यांच्या फ्लॅटची विक्री केल्याची माहिती असताना या तिघांनी फ्लॅटचा व्यवहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ब्रिजवल्लभ देवकीदास चांडक हे ६४ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार विलेपार्ले येथे राहत असून ते व्यवसायाने सीए आहेत. मालाड येथील रहिवाशी राजकुमार अमरचंद चुंग हे त्यांचे जुने परिचित मित्र असून इस्टेट एजंट म्हणून काम करतात. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत त्यांची राजकुमार यांनी सिद्धार्थ जाजूशी ओळख करुन दिली होती. सिद्धार्थची बोरिवलीतील गोराई एक, सुविधा सहकारी सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. पैशांची गरज असल्याने त्याला या फ्लॅटची विक्री करायची आहे असे सांगून त्यांना स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगितले. ब्रिजवल्लभ यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे तो फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दर्शवून त्यांच्याकडे फ्लॅटच्या कागदपत्रांची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे सिद्धार्थने त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे दिली होती. या कागदपत्रावरुन सिद्धार्थला तो फ्लॅट त्याचा भाऊ सुबोध जाजूने गिफ्ट डिड करार करुन दिला होता. बोरिवलीतील सब रजिस्ट्रार कार्यालयात तशी नोंदणी करण्यात आली होती. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून सिद्धार्थने सुबोधला कॉल करुन त्यांचे बोलणे करुन दिले होते. त्यानंतर ब्रिजवल्लभ हे फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी फ्लॅटमध्ये सिद्धार्थ व त्याची पत्नी अंजली जाजू हे दोघेच होते. घरात थोडेसे सामान होते, आपण लवकरच दुसरीकडे शिफ्ट करणार असल्याने काही सामान शिफ्ट केले आहे असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी विक्रीचा तीस लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. ठरल्याप्रमाणे ब्रिजवल्लभ यांनी त्यांना तीस लाखांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर सिद्धार्थने त्यांना फ्लॅटची चावी दिली होती. नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांच्यात फ्लॅटचे रजिस्ट्रर नोंदणी करण्यातआली होती. या करारात सिद्धार्थने त्याच्या फ्लॅटवर कोणतीही थकबाकी नसल्याचे, फ्लॅट मॉर्गेज केलेले नाही तसेच या फ्लॅटवर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नसल्याचे नमूद केले होते.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ब्रिजवल्लभ चांडक त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले होते. यावेळी तिथे अन्य व्यक्ती राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता तो फ्लॅट हर्षद भांजीवडमागा या व्यक्तीच्या नावावर असून त्यांनी हा फ्लॅट ३१ जानेवारी २०२३ रोजी बँकेच्या लिलाव प्रक्रियेत विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर १० ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला होता. चौकशीअंती सिद्धार्थ, अंजली आणि सुबोध यांनी या फ्लॅटवर कर्ज घेतले होते, मात्र त्यांनी या कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे बँकेने त्यांचा फ्लॅट जप्त करुन त्याची लिलावाद्वारे हर्षद वडमागा या व्यक्तीला विक्री केली होती. ही प्रक्रिया कायदेशीर असल्याने या फ्लॅटचे मालक आता हर्षद वडमागा हेच होते. फ्लॅटची बँकेने विक्री केली असताना जाजू कुटुंबियांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून ब्रिजवल्लभ यांच्याशी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांची सुमारे तीस लाखांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सिद्धार्थ, त्याची पत्नी अंजली आणि भाऊ सुबोध यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६८, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अंजली जाजूला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पळून गेलेल्या सिद्धार्थ आणि सुबोध यांचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page