मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मे २०२४
मुंबई, – गरजू गरीब लोकांसाठी कपडे आणि पैशांचे वाटप सुरु असून तुम्हाला मदत मिळवून देतो असे सांगून वयोवृद्धांना विशेषता महिलांच्या अंगावरील दागिने हातचलाखीने काढून फसवणुक करणार्या टोळीच्या म्होरक्यालाच हिंगोली येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. सुनिल सरदारसिंग शिंदे ऊर्फ सुनिल विठ्ठल मावरे ऊर्फ देवीदास रामदास मावरे ऊर्फ राहुल नारायण खिल्लारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने ताडदेव, शाहूनगर, वडाळा आणि वाकोला पोलीस ठाण्यातील अशाच पाच फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी ताडदेव पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांनी सांगितले.
६२ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या मुलीसोबत ताडदेव परिसरात राहते. चालताना घसरुन पडल्याने तिच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्यावर खाजगी डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. २२ एप्रिलला उपचार करुन ती घरी जात होती. यावेळी तिला दोन अज्ञात व्यक्तींनी थांबवून ताडदेव येथील बने कंपाऊंड परिसरात गरीब गरजू लोकांना पैशांसह कपड्याचे वाटप सुरु आहे. त्यासाठी त्यांना गरीब दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे तिने तिचे दागिने तिच्या पिशवीत ठेवून त्यांच्यासोबत यावे अशी विनंती केली. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने तिची सोन्याची चैन, अंगठी, कानातील साखळी पिशवीत काढून ठेवली. याच दरम्यान या दोघांनी हातचलाखीने ते दागिने घेऊन तेथून पलायन केले होते. काही वेळानंतर हा प्रकार निदर्शनास येताच तिने ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ताडदेव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांत अशा गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे त्याची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, पोलीस हवालदार अनभुले, मांगले, गायकवाड, कांबळे यांनी सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. या फुटेजमधील एक आरोपी सुनिल शिंदे असल्याचे उघडकीस आले. सुनिल हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अशाच दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद होती. या गुन्ह्यानंतर तो पळून गेला होता. तो अकोला, हिंगोली आणि परभणी येथे वास्तव्यास होता, मात्र प्रत्येक ठिकाणी तो जास्त दिवस राहत नव्हता. त्याचा शोध सुरु असताना तो हिंगोली येथे येणार असून तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्या पथकाने हिंगोली येथून सुनिल शिंदेला शिताफीने अटक केली. चौकशीत त्याने ताडदेव, शाहूनगर, वडाळा आणि वाकोला हद्दीत अशाच प्रकारे पाच फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याचा या सर्व पोलिसांकडून लवकरच ताबा घेतला जाणार आहे.