क्षुल्लक वादातून अंधेरीतील व्यावसायिकाची चाकूने भोसकून हत्या
मुख्य आरोपी आजन्म कारावासाची शिक्षा तर दुसर्याची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – डंपर भाड्याने देणार्या रामू नागप्पा धोत्रे या व्यावसायिकाची हत्या केल्याप्रकरणी तौफिक अब्दुल हुसैन खान या मुख्य आरोपी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून आजन्म कारावासासह दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याच गुन्ह्यांतील दुसरा आरोपी अब्दुल रजाक मोहम्मद हुसैन खान याची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे.
ही घटना २ फेब्रुवारी २०१६ रोजी रात्री साडेआठ वाजता अंधेरीतील गिल्बर्ट हिल, शिवसेना शाखेसमोरील अंबाजी ज्वेलर्स दुकानाजवळ घडली होती. रामू धोत्रे यांच्या डंपर भाड्याने देण्याचा व्यवसास असून त्यांच्या मालकीचे दोन डंपर आहेत. अंधेरीतील साईबाबा सोसायटी संघ, रुम क्रमांक पाचमध्ये रामू हे पत्नी, सहा मुले आणि त्यांचा भाऊ यलप्पा धोत्रे याच्यासोबत राहत होते. २ फेब्रुवारीला साडेआठ वाजता ते अंबाजी ज्वेलर्सचे मालक नाहर दसाणा आणि त्यांचा भाऊ यलप्पा धोत्रे याच्यासोबत गप्पा मारत बसले होते. काही वेळाने तिथे तौफिक आणि अब्दुल आले आणि या दोघांनी त्यांच्याकडील घातक शस्त्रांनी त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर त्यांनी रामू यांना उद्देशून तुने मुझे बहुत बार मारा है, अब तुझे दिखाता हू असे म्हणत त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. यावेळी त्यांचा भाऊ यलप्पाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले होते. हा प्रकार तिथे उपस्थित लोकांच्या लक्षात येताच त्यांनी हल्ला करुन पळून जाणार्या तौफिक खान आणि अब्दुल हुसैन या दोघांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर या दोघांनाही गस्तीवर असलेल्या डी. एन. नगर पोलिसांकडे सोपविले होते. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या रामू यांना नंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले तर यलप्पा याला प्राथमिक औषधोपचार करुन सोडून देण्यात आले.
यलप्पाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध मारामारीसह हत्येचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मे २०१६ रोजी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी न्या. नंदकिशोर मोरे यांच्या कोर्ट क्रमांक १३ मध्ये सुरु केली होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी न्या. नंदकिशोर मोरे यांनी तौफिक खानला हत्येच्या गुन्ह्यांत दोषी ठरविले होते. शुक्रवारी १० मेला याच गुन्ह्यांत त्याला आजन्म कारावासासह दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अब्दुल रजाक खान याची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. यातील तौफिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मारामारी, गंभीर दुखापत, जिवे मारण्याची धमकी देणे आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद होती. या खटल्यात सरकारी वकिल म्हणून सचिन जाधव यांनी साक्षीदार तपासून अंतिम युक्तीवाद केला तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय क्षीरसागर यांनी या गुन्ह्यांचा तपास करुन दोन्ही आरोपीविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंद्र, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोष्टी, महिला पोलीस शिपाई लिला सांगळे, पोलीस शिपाई अभिमन्यू पवार आणि फड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले होते.