नास्ता बनविला नाही म्हणून पत्नीवर पतीकडून प्राणघातक हल्ला
हातोडा, चाकूसह स्क्रु ड्रायव्हरने हल्ला करणार्या पतीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मे २०२४
मुंबई, – नास्ता बनविला नाही या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून गुडीया मोहम्मद फयुम खान या ३४ वर्षांच्या महिलेने तिच्याच पतीने हातोडा, चाकू आणि स्क्रु ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन हल्ल्यानंतर पळून गेलेल्या मोहम्मद फयुम जहीर खान या ३८ वर्षांच्या आरोपी पतीला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने कुर्ला परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना गुरुवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास कुर्ला येथील गणेश बाग लेन परिसरात घडली. याच परिसरातील रुम क्रमांक ३४ मध्ये गुडीया ही महिला तिचा पती मोहम्मद फयुम व दोन मुलांसोबत राहते. मोहम्मद फयुमचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी नास्ता बनविण्यावरुन किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे तो नास्ता न करता घरातून निघून गेला होता. काही वेळानंतर तो पुन्हा घरी आला आणि त्याने शिलाई मशिनवर ठेवलेल्या हातोड्याने तिच्या डोक्यावर मारहाण केली होती. नास्ता बनविण्यास तुला त्रास होतो ना, आता तुला संपवून टाकतो आणि पोलीस ठाण्यात हजर होतो असे सांगितले. त्यानंतर त्याने खिशातील चाकूने तिच्या गळ्यावर दोन ते तीन वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने तिने आरडाओरड सुरु केला. हल्ल्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती, त्याच अवस्थेत तिने त्याची माफी मागून तिला मारु नकोस अशी विनंती केली. तरीही त्याने मशीनवरील स्क्रु ड्राईव्हरनेही तिच्यावर हल्ला केला. त्यात ती बेशुद्ध झाली. तरीही त्याने तिला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती.
या घटनेनंतर शांत झाल्यानंतर तो तिला घेऊन जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिची दुखापत गंभीर असल्याने तिला तातडीने तिथे दाखल करण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. याच दरम्यान मोहम्मद फयुम तेथून पळून गेला. ही माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी गुडीयाने दिलेल्या जबानीवरुन पोलिसांनी तिचा पती मोहम्मद फयुमविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.