कॅप्सुलद्वारे कोकेन तस्करीचा दुसर्या गुन्ह्यांचा पर्दाफाश
पोटातून ११० कॅप्सुलमधून काढले पावणेदहा कोटीचे कोकेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्राझिलच्या नागरिकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मे २०२४
मुंबई, – कॅप्सुलद्वारे विदेशातून भारतात आणलेल्या कोकेन तस्करीच्या दुसर्या गुन्ह्यांचा महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत कार्लोस लिआंद्रो जोस कार्लोस ब्रुनो या ३२ वर्षांच्या ब्राझिलच्या नागरिकाला अटक करण्यात आली असून त्याच्या पोटातून ११० कॅप्सुलमधून पावणेदहा कोटीचे कोकेन काढण्यात या अधिकार्यांना यश आले आहे. अटकेनंतर कार्लोसला शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तीन दिवसांपूर्वी अशाच एका गुन्ह्यांत एका प्रवाशाला अटक करुन त्याच्या पोटातून ७७ कॅप्सुल काढले होते. त्यात असलेल्या कोकेनची किंमत सुमारे पंधरा कोटी होती. आता या विदेशी नागरिकाला अटक करुन पावणेदहा कोटीचे कोकेन जप्त केले आहे.
गेल्या काही दिवसांत विदेशातून होणार्या ड्रग्ज तस्करीच्या घटनेनंतर डीआरआयच्या अधिकार्यांनी प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची कसून तपासणी सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच ब्राझिल येथून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या कार्लोस याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने ड्रग्ज असलेले कॅप्सुल सेवन तसेच शरीरातून नेल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याला कोर्टात हजर करुन कोर्टाच्या आदेशावरुन जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांत त्याच्या पोटातून ११० कॅप्सूल काढण्यात आले असून त्यात कोकेन असल्याचे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सुमारे पावणेदहा कोटी रुपये इतकी आहे. या घटनेनंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.