मालिका अभिनेता अमर उपाध्यायची सव्वाकोटीची फसवणुक

शेअर गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो सांगून फसणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मे २०२४
मुंबई, – मालिका अभिनेता अमर उपाध्याय याची एका जोडप्याने सुमारे सव्वाकोटीची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून सव्वाकोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुणाल शहा आणि हिनल मेहता अशी या आरोपी पती-पत्नींची नावे असून ते दोघेही डायलाईट्स इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या दोघांनी शेअरमध्ये चांगला परवाता मिळवून देतो असे सांगून ही फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

अमर हर्षद उपाध्याय हा मालिका अभिनेता असून त्याने आतापर्यंत अनेक हिंदी आणि गुजराती मालिका, चित्रट आणि वेबसिरीजमधून काम केले आहे. सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड, राज क्लासिक पंचमार्ग अपार्टमेंटमध्ये राहतो. याच अपार्टमेंटमध्ये नवीन संघानी हे राहत असून त्यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी अमरची कुणाल शहासोबत ओळख करुन दिली होती. तो एका खाजगी इन्वेस्टमेंट कंपनीचा संचालक होता. त्यांची कंपनी शेअरमध्ये गुंतवणुक करुन अनेक गुंतवणुकदारांना चांगला परवाता मिळवून देत असल्याचे त्याने त्याला सांगितले होते. त्यांच्या कंपनीत नवीन संघानी यांनी गुंतवणुक केली होती, त्यामुळे त्यानेही त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्याला चांगला परतावा मिळवून देऊ असे कुणालने सांगितले होते. एप्रिल २०२२ रोजी कुणाल व त्याची पत्नी हिनल त्याच्या घरी आले होते. यावेळी या दोघांनी त्याला गुंतवणुकीवर पाच ते सात टक्के परवाता देण्याचे आश्‍वासन देत त्याचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. नवीन संघानीचा कुणाल हा परिचित असल्याने अमरने त्याच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यात गुंतवणुकीबाबत एक करार झाला होता. सुरुवातीला त्याने त्याच्याकडे वीस लाखांची गुंतवणुक केली होती.

जानेवारी २०२३ रोजी अमर हा त्याच्या कुटुंबियासोबत दुबई येथे फिरायला गेला होता. तिथे त्यांची कुणाल आणि हिनलशी भेट झाली होती. यावेळी त्यांनी त्याला दुसरी गुंतवणुक योजनेची माहिती देताना त्यात त्याला दरमाह व्याज मिळेल. जानेवारी २०२३ रोजी ठराविक रक्कम गुंतवणुक केल्यास त्याला डिसेंबर २०२६ पर्यंत सव्वापाच कोटी रुपये मिळतील असे सांगितले. त्यामुळे त्याने पुन्हा त्याच्याकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. काही दिवसांनी त्याने त्यांच्याकडे सव्वाकोटीची गुंतवणुक केली होती. या रक्कमेतून या दोघांनी त्यांच्या नावाने टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे सुमारे अडीच कोटीचे शेअर खरेदी केले होते. त्यातून त्याला टीडीएसची रक्कम वजा करुन पावणेतीन कोटी देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र नऊ लाख रुपये वगळता या दोघांनी त्यांना कुठल्याही परताव्याची रक्कम दिली नव्हती. जुलै २०२३ पासून अमर या दोघांनाही सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ते दोघेही विविध कारण सांगून त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी कुणालने सर्व शेअरची विक्री करुन त्याचे पैसे देण्याचे मान्य केले. मात्र दिलेल्या मुदतीत पैसे परत केले नाही. या शेअरची विक्री न केल्याने त्याच्या अकाऊंटमध्ये ६६ हजार ५८० एवढे शेअर लॉक झाले होते.

अशा प्रकारे कुणाल आणि हिनल या दोघांनी ४ मे ते १९ जुलै २०२३ या कालावधीत त्यांना कंपनीच्या शेअर खरेदीमध्ये चांगला परवाता देण्याचे आश्‍वासन देऊन त्याची सव्वाकोटीची फसवणुक केली होती. त्याच्या शेअरचा परस्पर अपहार करुन ही फसवणुक करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात येताच अमर उपाध्याय याने वर्सोवा पोलीस ठाण्यात कुणालसह त्याची पत्नी हिनल यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून सव्वाकोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वर्सोवा पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोपी पती-पत्नीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुंतवणुकदारांची फसवणुक केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page