मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ मे २०२४
मुंबई, – सात वर्षांपूर्वी अंधेरी परिसरात चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी एका ४२ वर्षांच्या बलात्कारी मुकादमला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरविले होते. याच गुन्ह्यांत त्याला दहा वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जमशेद बक्कर शेख ऊर्फ छोटू असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत चौदा वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहत होती. तिचे नातेवाईक अंधेरीतील एका बांधकाम साईटवर कामगार म्हणून काम करत होते. तिथे जमशेद शेख हा मुकादम म्हणून कामाला होता. याच दरम्यान त्याची पिडीत मुलीशी ओळख झाली होती. त्यातून त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर तिच्या आजीच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर त्यांनी जमशेद शेखविरुद्ध डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (६) भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. गेल्या सात वर्षांपासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच ही सुनावणी पूर्ण होऊन न्या. एस. एन साळवे यांनी जमशेदला भादवीसह पोक्सोच्या सर्व कलमांतर्गत दोषी ठरविले होते. ९ मेला या खटलाचा निकाल लागला. यावेळी न्यायमूर्तीं एस. एन साळवे यांनी जमशेद शेख याला दहा वर्षांच्या कारावासासह दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकिल म्हणून कनोजिया मॅडम यांनी साक्षीदार तपासून अंतिम युक्तीवाद केला तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंद्र, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोष्टी, महिला पोलीस शिपाई लिला सांगळे, पोलीस शिपाई अभिमन्यू पवार आणि फड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.