स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट देतो सांगून महिलेची फसवणुक
कुर्ला येथील घटना; तीन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – कुर्ला येथे म्हाडा वसाहतीत म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून एका महिलेची तीन भामट्यांनी सुमारे २१ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिलेल्या मुदतीत फ्लॅट तसेच फ्लॅटचे पैसे न देता महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी आबा पाटील, जॉय डॅनिअल आणि भगवान सिंग या तिघांविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जात असून त्याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिना हरिश्चंद्र शिरकर ही ५५ वर्षांची महिला कुर्ला येथे राहत असून तिला तीन मुली आहेत. या तिन्ही मुलीचे लग्न झाले असून त्यांच्यात लग्नात तिला प्रचंड कर्ज झाले होते. २१ वर्षांपूर्वी तिच्या पतीने नवी मुंबईतील खारघर परिसरात गुंतवणुक म्हणून एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटच्या विक्रीतून कर्ज फेडण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यामुळे तिने या फ्लॅटची विक्री करुन सर्वांचे कर्ज फेडले होते. उर्वरित रक्कमेचे तिने बँकेत एफडी केले. दोन वर्षांपूर्वी तिची आबा पाटीलशी ओळख झाली होती. त्याने तिला म्हाडाचे रुम देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा मित्र जॉय हा म्हाडा फ्लॅटची विक्री करत असून तो तिला कुर्ला येथील कामगारनगर, कॉस्मोप्झा इमारतीमध्ये एक फ्लॅट देईलअसे सांगितले. त्यानंतर त्याने तिची जॉयसोबत ओळख करुन दिली होती. त्याने तिला ५०० चौ. फुटाचा म्हाडाचा फ्लॅट तीस लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा भगवान सिंग हा मित्र असून तो म्हाडामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतो. तोच तिचे काम करणार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने म्हाडा फ्लॅटसाठी त्यांना कॅश आणि ऑनलाईन असे टप्याटप्याने २० लाख ७३ हजार रुपये दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला फ्लॅट दिला नाही. फ्लॅटविषयी विचारणा केल्यानंतर तिला उद्धट बोलत होते. काही दिवसांनी त्यांनी फ्लॅट देणार नाही आणि फ्लॅटसाठी दिलेले पैसेही विसरुन जा असे सांगितले. पोलिसात तक्रार केल्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली. त्यामुळे तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिने फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची त्यांनी आपसांत वाटणी केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने या तिघांविरुद्ध नेहरुनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आबा पाटील, जॉय डॅनिअल आणि भगवान सिंग या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.