मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – रिक्षात ठेवलेली सुमारे ६६ लाख ८५ हजारांची कॅश घेऊन एका रिक्षाचालकाने पलायन केले, याप्रकरणी गुन्हा दाखलहोताच पळून गेलेल्या रिक्षाचालकास काही तासांत अंधेरी येथून कुर्ला पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मोहम्मद अय्याज खुतूबुद्दीन खान असे या ५० वर्षांच्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सर्व कॅश हस्तगत करण्यात आली आहे. निवडणकीत काळात ही कॅश सापडल्याने त्याची माहिती कुर्ला पोलिसांकडून निवडणुक आयोगासह आयकर विभागाला देण्यात आली आहे. त्यामुळे या कॅशाबाबत आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे.
सुनिल बारसु फिरके हे मूळचे जळगावचे रहिवाशी असून ते एका अंगाडियाकडे कामाला आहेत. शनिवारी ते कामानिमित्त जळगाव येथून मुंबईत आले होते. यावेळी त्यांच्याकडे ६६ लाख ८५ हजार रुपयांची कॅश होती. ही घेऊन ते रिक्षातून कुर्ला येथील ग्रँड हेरिटेज हॉटेल असा प्रवास करत होते. हॉटेलचा पत्ता माहित नसल्याने काही लोकांकडे विचारणा करत होते. कुर्ला येथील सांताक्रुज-चेंबूर लिंक रोड, बाबा सिक पराठा हॉटेलजवळ आल्यानंतर ते रिक्षातून उतरुन हॉटेलचा पत्ता विचारत होते. यावेळी रिक्षाचालक त्यांची कॅश असलेली बॅग घेऊन पलायन केले. हा प्रकार लक्षात येताच सुनिल फिरके यांनी कुर्ला पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रिक्षाचालकाच्या अटकेसाठी पोलिसांनी कुर्ला, सांताक्रुज, वाकोला आणि अंधेरी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
जवळपास ३० ते ४० फुटेज पाहिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर निमजकर, पोलीस हवालदार सोनावणे, मानकरे, पाटील, साबळे, इंगळे यांनी तांत्रिक माहितीवरुन अंधेरी येथून मोहम्मद अय्याज खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच कॅश असलेली ही बॅग चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली सर्व कॅश हस्तगत केली. मोहम्मद अय्याज हा भाड्याने रिक्षा चालवत असून प्रवासादरम्यान त्याला बॅगेत कॅश असल्याचे समजले होते. त्यामुळे त्याने ती कॅश चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.