नफा कमवण्याच्या नादात तीन विदेशी महिलांना जेल

२.६० कोटीचे ४४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – भारतीय बाजारात सोन्याचे बार विकून जास्त नफा कमविण्यासाठी सोन्याची तस्करी करणे तीन विदेशी महिलांना चांगलेच महागात पडले. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी या तिन्ही महिलांना सीमा शुल्क विभागाने अटक केली असून त्यांची रवानगी भायखळा येथील महिला कारागृहात करण्यात आली आहे. नफा कमविण्याच्या नादात त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. समीरा मोहम्मद अब्दी, फिजा अब्दी देख हसन आणि फरदोसा अहमद अब्दी अशी या तिघांची नावे असून त्या मूळच्या केनियाच्या रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी ४४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार जप्त केले असून त्याची किंमत २ कोटी ६० लाख ३२ हजार ७८१ इतकी आहे.

शनिवारी समीरा, फिजा आणि फरदोसा हे तिघीही इथोपियन एअरवेजमधून अदिसअबाबहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी अडीच किलो वजनाचे सोन्याचे बार आणल्याची कबुली देताना सर्व कायदेशीर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यांच्याकडे अडीच किलोपेक्षा अधिक सोन्याचे बार असल्याचा संशय आल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्यांच्या अर्ंतवस्त्रातून २ कोटी ६० लाख रुपयांचे एकूण ४ किलो ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार सापडले. त्यामुळे सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध १३५ (१), (अ), १३५ (१), (ब) सीमाशुल्क कायदा १०४, १२० ब भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच समीरा, फिजा आणि फरदोसा या तिघींनाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांना ते सोन्याचे बार नैरोबी येथे राहणार्‍या अहमद नावाच्या व्यक्तीकडून क्रेडिटवर खरेदी केले होते. भारतातील स्थानिक बाजारपेठेत या सोन्याची बारची विक्री करुन त्यांना जास्त नफा मिळवून पुन्हा केनिया येथे जायचे होते. भारत आणि नैरोबी येथे सोन्याच्या दरात प्रचंड तफावत असून भारतात या बारच्या विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळणार होता, त्यामुळे त्यांनी या सोन्याची बारची तस्करी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर रविवारी दुपारी या तिघींनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page