आणखीन एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश
राजस्थानातील कारखान्यातून ११० कोटीचा एमडीसह दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – एमडी ड्रग्जच्या कारखान्यासह त्यात बनविण्यात येणार्या एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या मोहीमेला पुन्हा एकदा यश आले. उस्मानाबादनंतर राजस्थानात चार महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलेल्या एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश करुन साकिनाका पोलिसांनी या कटातील दोन मुख्य आरोपींना अटक केली. प्रशांत यल्लप्पा पाटील आणि हुकूमाराम चौधरी अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही राजस्थानातून सोमवारी मुंबईत चौकशीसाठी आणले जाणार आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जसहीत ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा ११० कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे एमडी ड्रग्ज तस्करी करणार्या आणि ड्रग्ज बनविणार्या कारखान्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच दरम्यान साकिनाका येथे काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ३१ डिसेंबर २०२३ रोजी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून सर्फराज खालिक शेख, माजिद उमर हासीर शेख आणि अब्दुल कादर रशीद शेख या तिघांना अटक केली होती. या तिघांकडून पोलिसांनी ३ कोटी ३५ लाख रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. तिन्ही आरोपींच्या चौकशीतून पुण्यातील प्रशांत पाटील या व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्यामुळे प्रशांतच्या अटकेसाठी साकिनाका पोलिसांची एक टिम पुण्याला गेली होती. या पथकाने प्रशांतला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने उस्मानाबादनंतर राजस्थानात एमडी ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सुरु केल्याची कबुली दिली. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक पंकज परदेशी, पोलीस हवालदार चंद्रकांत पवार, दत्तात्रय बाठे, पोलीस शिपाई आदित्य जाधव, अनिल कारंडे यांनी राजस्थानच्या जोधपूर, मोगरा खुर्द परिसरात सुरु असलेल्या एमडी ड्रग्जच्या कारखान्यात छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी हुकूमाराम चौधरी याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या राहत्या घराजवळ एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यातून पोलिसांनी १२५ किलो ऍल्युमिनियम क्लोराईड, ४० बॉटल्स ब्रोमिन लिक्वीड, २८० किलो क्लोरोफॉम लिक्वीड आणि ६७ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे ११० कोटी रुपये इतकी आहे.
चौकशीत प्रशांत हा शास्त्रज्ञ असून त्यानेच एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी या टोळीला फॉर्म्युला दिला होता. त्याने सचिन कदमच्या सांगण्यावरुन हुकमाराम चौधरीच्या मदतीने राजस्थानच्या जोधपूर, मोगरा खुर्द परिसरात एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. त्याने बीएसई केमिस्ट्रीपर्यंत शिक्षण घेतले असून तो पूर्वी महाडच्या एमआयडीसी कंपनीत कामाला होता. तिथेच त्याची ओळख एका वॉण्टेड आरोपीशी झाली होती. त्याने त्याला पैशांचे आमिष दाखवून एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु करण्याची विनंती केली होती. त्यानंतर प्रशांतने उस्मानाबाद येथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. त्यासाठी त्याने सहा महिने विशेष परिश्रम घेऊन ड्रग्जबाबत रिसर्च केला होता. हा रिसर्च यशस्वी झाल्यानंतर त्याने राजस्थान येथे दुसरा एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. प्रशांतसह हुकूमाराम या दोघांनाही अटक केल्यानंतर सोमवारपर्यंत मुंबईत चौकशीसाठी आणले जाणार आहे. त्यानंतर या दोघांनाही दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करुन त्यांच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.