मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ मे २०२४
मुंबई, – कामावरुन घरी जाणार्या एका ४५ वर्षांच्या व्यावसायिकाचे दोन अज्ञात व्यक्तींनी पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात घडली. ६० लाख रुपयांची खंडणीची रक्कम दिल्यानंतर या व्यावसायिकासह त्याच्या कारचालकाची सुटका करण्यात आली. पोलिसांत तक्रार केल्यास त्यांच्यासह पत्नी आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने व्यावसायिकांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही, अखेर चार दिवसानंतर त्यांनी समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरण, खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
तक्रारदार व्यावसायिक बोरिवली परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय असून त्यांचे अंधेरी येथे कार्यालय आहे. बुधवारी ८ मेला ते त्यांच्या मित्रासोबत काम संपवून अंधेरीतील कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा कारचालक होता. रात्री नऊ वाजता ते कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सर्व्हिस रोडवर आले. तिथे त्यांचा मित्र कारमधून उतरला होता. यावेळी रेड सिग्नल असल्याने त्यांची कार तिथे थांबली होती. कारचालकाने कार लॉक करण्यापूर्वीच तिथे दोन तरुण आले आणि ते दोघेही जबदस्तीने कारमध्ये बसले. या दोघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना कार दहिसरच्या दिशेने घेऊन जाण्यास सांगितले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी शिवीगाळ करुन त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडे पाच कोटीच्या खंडणीची मागणी केली. पत्नी आणि दोन्ही मुलींना जिवंत पाहायचे आहे ना, मग पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांनी त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्यांनी पाच कोटी नसून आपण २० लाखांची व्यवस्था करतो असे सांगितले, त्यामुळे चिडलेल्या एकाने त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांनी ६० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम त्याच्या घरी आल्याने त्यांनी त्यांना घराजवळ येण्याची विनंती केली. त्यामुळे ते सर्वजण त्यांच्या बोरिवलीतील घराजवळ आले. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन करुन बॅगेत ६० लाख रुपये भरुन त्यांच्या कारचालकास देण्यास सांगितले.
काही वेळानंतर त्यांचा कारचालक त्यांच्या घरी गेला आणि त्याने साठ लाख रुपये आणून त्यांना दिले. त्यानंतर ते कार घेऊन रेहजा सर्कलजवळ गेले. तिथे ते दोघेही उतरले. यावेळी या दोघांनी त्यांना पोलिसांत तक्रार केल्यास पत्नी आणि मुलींची हत्या करण्याची धमकी दिली होती. सुखरुप सुटका झाल्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसह दोन्ही मुलींनर घडलेला प्रकार सांगितला. या प्रकारामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यामुळे जिवाच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला. अखेर कुटुंबियांसह नातेवाईक आणि मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी चार दिवसानंतर समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध ३२३, ३६४ अ, ३८६, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणासह खंडणीच्या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले आहे. या घटनेमागे व्यावसायिकाच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असून त्यांची टिप त्यानेच अपहरणकर्त्यांना दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे व्यावसायिकाच्या कारचालक, मित्रांसह इतर परिचित लोकांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून या गुन्ह्यांचा पर्दाफाश होईल असे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.