डॉक्टरच्या कानशिलात लगावणे महागात पडले

केईएम हॉस्पिटलची घटना; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मे २०२४
मुंबई, – ऑपरेशनसाठी आवश्यक साहित्य घेऊन जाताना धक्का लागला म्हणून एका २५ वर्षांच्या तरुणाने डॉक्टरच्या कानशिलात लगावून मारहाणीचा प्रयत्न केल्याचा प्रकार केईएम हॉस्पिटलमध्ये घडला. याप्रकरणी निखील राजा ठाकूर या तरुणाविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी भादवीसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर निखील ठाकूरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

ही रविवारी रात्री साडेदहा वाजता परळच्या केईएम हॉस्पिटलच्या ईएनटीसमोरील पॅसेजमध्ये घडली. डॉ. तेजस संतबेनुरु मंजूनाथ हे मूळचे बंगलोरचे रहिवाशी असून त्यांनी अलीकडेच त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते एमएसचे शिक्षण घेत असून त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला होता. गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षण घेताना ते हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. रविवारी त्यांची एमएसईएनटी विभागात ड्युटी होती. रात्री साडेदहा वाजता ते ऑपरेशसाठी लागणारे साहित्य घेऊन घाईने बाहेर जात होते. यावेळी चालताना त्यांचा धक्का निखील ठाकूरला लागला होता. त्यावरुन त्याने त्यांना शिवीगाळ, एकेरी भाषेत उल्लेख करुन त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातील शाब्दिक वाद सुरु असताना अचानक त्याने त्यांच्या कानशिलात लगावून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे उपस्थित कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती नंतर सुरक्षारक्षकांना देण्यात आली. मारहाण करणार्‍या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मारहाणीत डॉ. तेजस मंजूनाथ यांच्या कानाला दुखापत झाली होती. त्यांच्या कानाचा पडदा फाटला होता. त्यामुळे त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी भोईवाडा पोलिसांत निखील ठाकूरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तो प्रभादेवीतील साईसिद्धी इमारत, नारळवाडीचा रहिवाशी आहे. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन कर्तव्य बजाविणार्‍या एका डॉक्टरच्या कानशिलात लगावणे निखीलला आता चांगलेच महागात पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page