मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मे २०२४
मुंबई, – शहरातील दोन नामांकित बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या तीन बिल्डरविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कश्यप मेहता, अतुल भराणी आणि अशोक भराणी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही सनशाईन हाऊसिंग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि एसक्यू इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत. सोळा वर्षांपूर्वी बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तींना विक्री करुन या तिघांनी एका व्यावसायिकाची २ कोटी ७८ लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्याने या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
व्यवसायाने इंटेरिअर डिझाईनर असलेले जेरी ऍन्थोनी डिकुना हे वसई परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असून त्यांचा वसई येथे इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय आहे. २००८ साली ते नवीन घराच्या शोधात होते. यावेळी त्यांच्या परिचित परवेज लकडावाला यांनी त्यांची मेसर्च ग्रेस इरेक्टर नावाची बांधकाम कंपनी असून या कंपनीचे शिवडी आणि वडाळा पसिरात काही इमारतीचे प्रोजेक्ट सुरु असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडाळा येथील इमारतीची पाहणी करुन तिथे दोन फ्लॅट बुक केले होते. दोन्ही फ्लॅटची किंमत १ कोटी १९ लाख रुपये इतकी होती, त्यामुळे त्यांनी बारा लाख रुपये टोकन देऊन फ्लॅट बुक केले होते. या पेमेंटनंतर त्यांना अलोटमेंट लेटर देण्यातआले होते. यावेळी परवेजने त्यांना ६० महिन्यांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन दोन्ही फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांनी १५ ऑक्टोंबर २०१० रोजी ३५ लाख आणि १५ सप्टेंबर २०११ रोजी ६५ लाखांचे पेमेंट केले होते. याच दरम्यान परवेजने इतर किंमतीत वाढ झाल्याने त्यांच्याकडे दोन्ही फ्लॅटसाठी आणखीन ३८ लाखांची मागणी केली होती. त्यास त्यांनी होकार दिला होता. त्यामुळे या फ्लॅटची किंमत १ कोटी ४५ लाख रुपये इतकी झाली होती.
२०१२ रोजी परवेजने त्यांचा प्रोजेक्ट सनसाईन हाऊसिंग ऍण्ड इन्फ्रास्टक्चर कंपनीचे मालक कश्यप मेहता यांना विक्री केला होता. त्यामुळे त्यांनी कश्यपची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना फ्लॅटची किंमत १ कोटी ११ लाख रुपये असल्याचे सांगून त्यांना दोन फ्लॅटसाठी २ कोटी २२ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांनी परवेजला १ कोटी ४५ लाख रुपयांचे पेमेंट केले होते, त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर उर्वरित ७७ लाख रुपयांचे मान्य केले होते. २८ मार्च २०१३ रोजी त्यांच्या दोन्ही फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले होते. यावेळी त्यांनी कश्यप मेहताला उर्वरित पेमेंट केले होते. यावेळी मार्च २०१५ पर्यंत त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरे होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे इमारतीचे बांधकाम बंद पडले होते. त्यामुळे कश्यप यांनी अतुल आणिअ अशोक भराणी यांच्या एसक्यू इन्फ्रास्ट्रक्चर प्रयव्हेट लिमिटेड कंपनीच्या मदतीने २०१८ साली कंपनीने पुन्हा इमारतीचे काम सुरु केले. २०२२ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने जेरी डिकुना यांनी त्यांच्या फ्लॅटबाबत विचारणा केली. मात्र पेमेंटवरुन झालेल्या वादातून त्यांनी त्यांच्या दोन्ही फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित तिन्ही मालकाविरुद्ध ग्राहक आणि मुंबई उच्च न्यायालयात व्यावसायिक शूट दाखल केली होती. सुनावणीदरम्यान भराणी यांनी त्यांच्या दोन्ही फ्लॅटची इतर ग्राहकांना विक्री करण्यात आल्याची माहिती दिली. या माहितीने त्यांना धक्काच बसला होता.
चौकशीदरम्यान त्यांच्या फ्लॅटची यासिन जयेश चावला आणि जयेश रामचंद्र चावला यांना विक्री करण्यात आली होती. २००८ ते २०२४ या कालावधीत दोन्ही फ्लॅटसाठी त्यांनी परवेज लकडवाला याच्या ग्रेस इरेक्टर कंपनीला १ कोटी ४५ लाख, कश्यप मेहता याच्या सनशाईन हाऊसिंग कंपनीला २९ लाख ७० हजार तर अतुल भराणी यांच्या एसक्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीलपा ९८ लाच ९५ हजार असे २ कोटी ७८ लाख ७९ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र पेमेंट करुन त्यांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन कश्यप मेहता, अतुल भराणी आणि अशोक भराणी यांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी या तिघांविरुद्ध भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बांधकाम कंपनीच्या तिन्ही मालकांविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येण्यात येणार आहे.