मालिका पाहून कारचालकानेच केले खंडणीसाठी मालकाचे अपहरण

६० लाखांची खंडणी वसुल करणार्‍या कारचालकासह मित्रांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मे २०२४
मुंबई, – अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी मालिका पाहून प्रभावित झालेल्या एका कारचालकाने त्याच्याच दोन मित्रांच्या मदतीने स्वताच्या व्यावसायिक मालकाचे अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी ६० लाखांची खंडणी वसुली केली होती, मात्र गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी कारचालकासह त्याच्या दोन्ही मित्रांना काही तासांत समतानगर पोलिसांनी अटक केली. सागर आप्पा पवार, किरण महादेव भोसले आणि मकरंद कारांडे अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. योजना यशस्वी झाल्यानंतर या तिघांनी बारमध्ये काही पैसे उडविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या तिघांकडून उर्वरित कॅश हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार व्यावसायिक बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा अंधेरी येथे स्वतचा व्यवसाय आहे. बुधवारी ८ मेला ते त्यांच्या मित्रासोबत अंधेरीतील कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा कारचालक सागर पवार होता. रात्री नऊ वाजता ते कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सर्व्हिस रोडवर आले. तिथे त्यांचा मित्र कारमधून उतरला. यावेळी रेड सिग्नल असल्याने त्यांची कार तिथेच थांबली होती. कारचालकाने कार लॉक करण्यापूर्वीच दोन तरुण कारमध्ये बसले. या दोघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना कार दहिसरच्या दिशेने घेऊन जाण्यास सांगितले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी शिवीगाळ करुन त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडे पाच कोटीच्या खंडणीची मागणी केली. पत्नीसह दोन्ही मुलींना जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी पाच कोटी नसून आपण २० लाखांची व्यवस्था करतो असे सांगितले, त्यामुळे चिडलेल्या एकाने त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांनी ६० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम त्याच्या घरी आल्याने त्यांनी त्यांना घराजवळ येण्याची विनंती केली. त्यामुळे ते सर्वजण त्यांच्या बोरिवलीतील घराजवळ आले. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन करुन बॅगेत ६० लाख रुपये भरुन त्यांच्या कारचालकास देण्यास सांगितले. काही वेळानंतर त्यांचा कारचालक त्यांच्या घरी गेला आणि त्याने साठ लाख रुपये आणून त्यांना दिले. त्यानंतर ते कार घेऊन रेहजा सर्कलजवळ गेले. तिथे ते दोघेही उतरले. यावेळी या दोघांनी त्यांना पोलिसांत तक्रार केल्यास पत्नी आणि मुलींची हत्या करण्याची धमकी दिली होती. सुखरुप सुटका झाल्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसह दोन्ही मुलींनर घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकारामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यामुळे जिवाच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला. अखेर कुटुंबियांसह नातेवाईक आणि मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी चार दिवसानंतर समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध ३२३, ३६४ अ, ३८६, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणासह खंडणीच्या तक्रारीची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण राणे यांच्या पथकातील एपीआय सतीश गंगापूरकर, अंमलदार रोहन गायकवाड, अभिषेक पातण, व्हिटक्र कोलासो, सुमीत अहीवळे, सुनिल निजई यांनी तपास सुरु केला होता. तपासात या घटनेमागे तक्रारदाराच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असावा, त्यानेच अपहरणकर्त्यांना ही टीप देऊन हा गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय होता.

हाच धागा पकडून पोलिसांचा तपास सुरु असताना सागर हा अचानक पळून गेला होता. त्यामुळे सागरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तोच या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्याने त्याचे दोन मित्र किरण भोसले आणि मकरंद कारांडे यांच्या मदतीने त्याच्या व्यावसायिक मालकाचे अपहरण घडवून त्यांच्या सुटकेसाठी साठ लाखांची खंडणी वसुली केली होती. त्याला त्यांच्या घरी पैसे असल्याची माहित होते. मालिका पाहून त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी अपहरणाची ही योजना बनविली होती. त्यासाठी या दोन्ही मित्रांनी दोन ते तीन दिवस त्यांचा पाठलाग करुन रेकी केली होती. व्यावसायिकाचा मित्र कारमधून उतरल्यानंतर त्याने कार लॉक केले नाही. हीच संधी साधून ते दोघेही कारमध्ये बसले होते. खंडणी स्वरुपात मिळालेली रक्कम त्याने एका बारमध्ये उडविली होती. उर्वरित कॅश त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांनी सांगितले. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांनी अपहरण करुन खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page