३० लाखांचा पेमेंटचा अपहार करुन कंपनीची फसवणुक
अंधेरीतील घटना; कंपनीच्या अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मे २०२४
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून आलेल्या सुमारे ३० लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन कंपनीची एका अधिकार्यानेच फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विशाल भारतीय या अधिकार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
प्रशांत अशोक मेहता हे बेलापूर, सीबीडीचे रहिवाशी असून गेल्या २१ वर्षांपासून रॅक इंटरनॅशनल कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम करतात. या कंपनीचे एक कार्यालय अंधेरीतील नंदज्योत इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. कंपनीत सोन्यासह चांदीचे दागिने बनविले जातात. संपूर्ण भारतात विविध ग्राहकांना दागिन्यांची विक्री केली जाते. अनेकदा त्यांच्या कंपनीचे कर्मचारी दागिने डिलीव्हरी करुन विक्रीतून आलेले पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा करतात. याच कंपनीत सप्टेंबर २०१७ पासून विशाल भारतीय हा कामाला लागला होता. त्याच्याकडे बिझनेस डेव्हल्पमेंट, प्रोडेक्ट मार्केटिंग आणि सेलची जबाबदारी होती. त्याचे काम पाहून कंपनीने त्याला एक वर्षांनी एका झोनची जबाबदारी सोविली होती. त्यात हैद्राबाद, तेलंगणा, आणि महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे. अनेकदा विशाल दागिन्यांची विक्री करुन पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा करत होता. त्याची तो स्वत नोंदवहीत हिशोब ठेवत होता. त्यामुळे त्याच्यावर वरिष्ठ अधिकार्यांचा प्रचंड विश्वास होता.
जानेवारी २०२४ नंतर विशालकडून हिशोबात काही प्रमाणात घोळ होत असल्याचे काही अधिकार्यांच्या निदर्शनास आले होते. कंपनीने विशालला सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने दिले होते, मात्र त्याचे पेमेंट त्याने कंपनीच्या बँक खात्यात जमा केले नव्हते. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. चौकशीदरम्यान त्याने हैद्राबादच्या गायत्री ज्वेलर्सला ३० लाखांचे दागिने विक्री केले होते. मात्र त्यांच्याकडून पेमेंट आले नाही असे सांगितले होते. त्यामुळे प्रशांत मेहता हे स्वतला हैद्राबादला गेले होते. तिथे त्यांनी गायत्री ज्वेलर्सच्या मालकांची भेट घेतली होती. यावेळी विशालने पेमेंटचे पैसे कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता स्वतच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केले होते. अशाच प्रकारे त्याने जानेवारी ते एप्रिल महिन्यांत विविध ग्राहकांकडून सुमारे ३० लाखांचे पेमेंट स्वतच्या वैयक्तिक बँक खात्यात घेतले, मात्र ती रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने प्रशांत मेहता यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विशालविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.