मुंबईसह पुणे, सांगली शहरात बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ

पत्नी सोडून गेल्याने नैराश्यातून मद्यपी पतीकडून बोगस कॉल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मे २०२४
मुंबई, – मुंबईसह पुणे आणि सांगली शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा बोगस कॉल संपूर्ण पोलीस यंत्रणेला कामावर लावणार्‍या सचिन शिंदे नावाच्या एका आरोपीस रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सचिन हा दारुच्या पूर्णपणे आहारी गेला असून त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. त्यामुळे मानसिक नैराश्यातून त्याने चोरी केलेल्या मोबाईलवरुन हा बोगस कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सांगली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पाच दिवसांपूर्वी मुंबईसह पुणे आणि सांगली शहरातील पोलीस नियंत्रण कक्षाला सचिन नाव सांगणार्‍या एका व्यक्तीने बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने कॉल बंद केला होता. लोकसभेसाठी राज्यात निवडणुक होत आहे. सोमवारी मतदान होणार असल्याने त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली होती. महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी करुन तेथील बंदोबस्त वाढविण्यात आले होते. दुसरीकडे या कॉलची पोलिसांनी शहानिशा केली असता तो कॉल बोगस असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे कॉल करणार्‍या आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना कॉल करणारा आरोपी सीएसएमटी रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे आलेल्या सचिन शिंदे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत सचिन हा दारुच्या पूर्णपणे आहारी गेला असून त्यावरुन त्याचे त्याच्या पत्नीसोबत अनेकदा खटके उडत होते. त्याला कंटाळून ती माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून तो मानसिक तणावात होता. त्यातून त्याने मुंबईसह पुणे आणि सांगली नियंत्रण कक्षाला आगामी दिवसांत बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल केला होता. काही दिवसांपूर्वी त्याने एका अंध जोडप्यांचा मोबाईल चोरी केला होता. कॉल केल्यानंतर आपल्यापर्यंत पोलीस पोहचू नये म्हणून त्याने याच चोरीच्या मोबाईलवरुन ही धमकी दिली होती. मात्र या कॉलनंतर त्याने त्याच्या भावाला कॉल केला आणि तो पकडला गेला. तपासात सचिनने यापूर्वीही पोलिसांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे कॉल केल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याची संबंधित पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page