मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मे २०२४
मुंबई, – सुमारे ८२ लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी टिकमदास ज्वेलर्सचे मालक रिषभ प्रकाश पाहुजा याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
प्रितेश दिलीप वाडेकर हे हिरे व्यापारी असून त्यांचा मालकीचे झव्हेरी बाजारात गिरी गोल्ड नावाचा सोन्याचे दागिने आणि हिरेजडीत दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. याच ठिकाणी त्यांचा दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे. ते व्यापार्याकडून होलसेलमध्ये सोने घेऊन, या सोन्याचे दागिने बनवून त्याची इतर व्यापार्यांना विक्री करतात. जून २०२२ रोजी त्यांची रिषभ पाहुजा याच्याशी ओळख झाली होती. रिषभ हा ज्वेलर्स व्यापारी असून त्याचा लोअर परेल येथील मथुरादास मिलमध्ये सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, हिरेजडीत दागिने बनविण्याचा कारखाना होता. त्याने त्यांच्याकडे हिरेजडीत दागिने बनविण्यासाठी काही हिर्यांची मागणी केली होती. त्यासाठी रिषभ हा स्वत त्यांच्या दुकानात आला होता. हिरे घेतल्यानंतर त्याने ऑनलाईन पेमेंट करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर रिषभच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांच्या कर्मचार्याला क्रेडिटवर हिरे दिले होते. २५ जून ते २७ जून २०२२ या कालावधीत रिषभने त्यांच्याकडून ८५ लाख २२ हजार २८२ रुपयांचे हिरे क्रेडिटवर घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्यांचे पेमेंट केले नाही. हा प्रकार प्रितेशने त्यांचे वडिल दिलीप वाडेकर यांना सांगितला. यावेळी त्यांनी टिकमराम ज्वेलर्सचे मालक रिषभ पाहुजा हे प्रतिष्ठित व्यापारी असून त्यांच्याकडून त्याची फसवणुक होणार नाही. पेमेंट मिळेल, चिंता करु नकोस असे सांगितले. त्यामुळे त्यांनी रिषभविरुद्ध पोलिसांत तक्रार केली नव्हती.
एप्रिल २०२४ रोजी रिषभचा भाऊ चिराज पाहुजा त्यांच्या दुकानात आला होता. यावेळी त्यांनी हिर्यांच्या पेमेंटविषयी त्याच्याशी चर्चा केली होती. मात्र चिरागने त्यांना कुठले हिरे, कुठले पेमेंट असे अरेरावी भाषा करुन त्यांना पैसे देणार नाही असे सांगितले होते. विश्वासाने दिलेल्या हिर्याचा रिषभने परस्पर विक्री करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रिषभ पाहुजाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.