भाड्याने फ्लॅट देण्याच्या आमिषाने महिलेची ऑनलाईन फसवणुक

वेबसाईटवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधणे महागात पडले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – भाड्याने फ्लॅट देण्याच्या आमिषाने एका ३५ वर्षांच्या महिलेची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संजयकुमार नाव सांगणार्‍या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एका वेबसाईटवर मिळालेल्या मोबाईल संपर्क साधणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

तक्रारदार महिला मूळची मध्यप्रदेशच्या इंदौर शहराची रहिवाशी असून ती एका खाजगी कंपनीत अकाऊंट म्हणून काम करते. सध्या ती तिच्या मैत्रिणीसोबत अंधेरीतील मरोळ परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. तिला भाड्याने दुसर्‍या फ्लॅटची गरज असल्याने तिने एका खाजगी वेबसाईटवरील क्रमांकावर भाड्याच्या फ्लॅटविषयी विचारणा केली होती. यावेळी संजयकुमार नाव सांगणार्‍या या व्यक्तीने त्याच्या मालकाचे अंधेरीतील डी. एन नगर, साई द्वारका अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट असल्याचे सांगून तिला फ्लॅटचे काही फोटो पाठविले. तो फ्लॅट आवडल्याने तिने संजयकुमारला त्याच्या फ्लॅट भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी त्यांच्यात एक लाख रुपये डिपॉझिट आणि २९ हजार भाडे असे ठरले होते. तिने डिपॉझिटसह भाडे देण्याची तयारी दर्शवून फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्याला पूर्ण रक्कम देऊ असे सांगितले. यावेळी त्याने आधीच एका व्यक्तीकडून टोकन घेतले असून ती रक्कम त्याला परत केल्यानंतर तो तिला फ्लॅट दाखवेन असे सांगून तिला ऑनलाईन काही पेमेंट करण्यास सांगितले. त्यामुळे तिने त्याला अकरा हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करुन करारासाठी तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्टचे फोटो व्हॉटपवर पाठविले होते.

दुसर्‍या दिवशी त्याने तिच्याकडून आणखीन अठरा हजारची मागणी केली. त्यामुळे तिने त्याला पुन्हा अठरा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. २३ जानेवारीला त्याने तिला फोन करुन सोसायटीचे सव्वालाखाचे मेन्टनन्स बाकी असून फ्लॅटचे भाडे करार करण्यासाठी त्याला सोसायटीची एनओसी लागेल. त्यामुळे मेटन्टन्ससाठी त्याने तिच्याकडून आणखीन ७१ हजाराची मागणी केली होती. संजयकुमारला पैशांची अडचण असल्याने तिने त्याला ती रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केली. २४ जानेवारीला ती त्याच्या सांगण्यावरुन फ्लॅट पाहण्यसाठी साई द्वारका अपार्टमेंटजवळ आली होती. तिने संजयकुमारला कॉल केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर त्याचा फोन बंद झाला. तिने त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन बंद येत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने ऑनलाईन १९३० क्रमांकावर तक्रार केली होती. त्यानंतर ती तिच्या मध्यप्रदेशातील घरी निघून गेली होती.

१२ फेब्रुवारीला ती मुंबईत परत आली. यावेळी तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संजयकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यांचा एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती मिळविण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. ते बँक खाते कोणाच्या नावावर आहे. त्यात अशाच प्रकारे इतर काही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page