मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात

मुंबई पोलिसांसह होमगार्ड, दंगल नियंत्रण पथकासह केंद्रीय सुरक्षा दलाची नियुक्ती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मे २०२४
मुंबई, – राज्यातील शेवटच्या आणि मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात सोमवारी होणार्‍या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मतदानाच्या दिवशी मुंबई शहरात ३० हजाराहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक आणि केंद्रीय सुरक्षा दलाला नियुक्त करण्यात आले आहे. मुंबईतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शनिवारी मुंबई पोलिसांकडून बहुतांश ठिकाणी रुट मार्च करण्यात आले होते. दरम्यान मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोशल मिडीयावरुन केले आहे.

सोमवारी २० मेला मुंबईसह उपनगरात लोकसभेच्या सहा जागासाठी मतदान होणार आहे. यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यासोबत निवडणुक अधिकार्‍यांची एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत शहरातील बंदोबस्ताबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या चर्चेनंतर मतदानाच्या दिवशी शहरात पोलीस आयुक्तांसह सर्व सहपोलीस आयुक्त, पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त २५ पोलीस उपायुक्त, ७७ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ४७५ पोलीस अधिकारी, २२ हजार १०० पोलीस अंमलदार, तीन दंगल नियंत्रण पथकाला सर्वत्र तैनात करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त १७० पोलीस अधिकारी, ५ हजार ३६० पोलीस अंमलदार, ६ हजार २०० होमगार्ड आदींची मदत घेण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या ३६ ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलाला बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे.

अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी होणार्‍या मतदानासाठी संपूर्ण शहरात २ हजार ७५२ पोलीस अधिकारी, २७ हजार ४६० पोलीस कर्मचारी, ६ हजार २०० होमगार्ड, तीन दंगल नियंत्रण पथक, ३६ केंद्रीय सुरक्षा दलाचा समावेश असणार आहे. शहरात सध्य आचारसंहिता लागू झाली असून १६ मेपासून आतापर्यंत मुंबई पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक पार पाडण्यासाठी एकून ८ हजार ८८ लोकांवर कारवाई केली आहे. सर्व मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे की, फौजदार दंड सहिता कलम १४४ अन्वये १५ मेला पोलिसांकडून एक आदेश प्रसारीत करण्यात आले आहे. त्यात मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत आणि मतदान केंद्र परिसरात मोबाईल फोन बाळगण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे त्याचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लघंन करणार्‍यांविरुद्ध ठोस कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पोलिसांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page