नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्कच्या सभेत घातपाताची धमकी
टिव्हीवर सभा पाहून टाईमपास करणार्या करणार्या तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मे २०२४
मुंबई, – लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्यातील मुंबईतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील सभेत घातपात होणार असल्याचा कॉल करुन सर्वत्र खळबळ उडवून देणार्या कन्नप्पा रेड्डी नावाच्या एका तरुणाला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून सध्या कसून चौकशी सुरु आहे. कन्नप्पाने शुक्रवारी टिव्हीवर सुरु असलेली सभा पाहून टाईमपास म्हणून घातपात होणार असल्याचा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र टाईमपास म्हणून कॉल करणे त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे.
शुक्रवारी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात महायुती तर वांद्रे येथील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजीत पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते. या सभेचे सर्वच वृत्तवाहिनीवर थेट प्रेक्षपण दाखविण्यात येत असल्याने मुंबई पोलिसांनी तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व खबदारी पोलिसाकडून घेण्यात आली होती. सायंकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉ केला. त्याने नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात घातपात होणार आहे. सतर्क रहा असे सांगून कॉल कट केला होता. ही माहिती नंतर कंट्रोल रुमच्या अधिकार्यांनी वरिष्ठांनी दिली होती. त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा पथकाला ही माहिती सांगून सतर्क राहण्याची विनंती केली होती. दुसरीकडे हा कॉल बोगस असल्याचे उघडकीस येताच अज्ञात व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आंबोली परिसरातून कन्नप्पा रेड्डी या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा कॉल केल्याचे उघडकीस आले होते. टिव्ही सभा पाहून त्याने टाईमपास म्हणून हा कॉल केला होता असे सांगितले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.