मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन

१६०५ ठिकाणी नाकाबंदी तर २०५ ठिकाणी कोंबिग ऑपरेशन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ मे २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात होणार्‍या शेवटच्या मतदानादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली असता काही समाजकंटकाकडून होणार्‍या संभाव्य घातपाताच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शनिवारी अचानक शहरात ऑल आऊट ऑपरेशन हाती घेतले होते. संपूर्ण शहरात १६०५ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली तर २०५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले होते. यावेळी १ हजार ९५ अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले, त्यात विविध गुन्ह्यांतील २१२ तर सात फरारी-पाहिजे आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. ५ हजार ८३६ वाहनांची तपासणी करण्यात आली. १ हजार ५५८ वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत तर ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह मोहीमेतर्ंगत एका वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यांत दोन वेळा मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन हाती घेऊन ही कारवाई केली होती.

३ मेला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाच्या बंदोबस्तादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी रात्री अकरा वाजता अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरु केले होते. या मोहीमेला काही दिवस उलटत नाही तोवर शनिवारी १८ मेला पुन्हा मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर ऑल आऊट ऑपरेशन हाती घेतले होते. रात्री एक वाजेपर्यंत ते ऑपरेशन सुरु होते. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, तेरा झोनल पोलीस उपायुक्त, ४१ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलिसांकडून २०५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून १ हजार ९५ अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले, त्यात विविध गुन्ह्यांतील २१२ तर सात फरारी-पाहिजे आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. सतराजणांवर अजामिनपात्र वॉरंट बजावून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

एनडीपीएस कलमांतर्गत ४६, अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३१ जणांवर कारवाई करण्यात आली. या आरोपींकडून चाकूसह तलवारीसारखे घातक शस्त्रे जप्त करण्यात आले. पंधराहून अधिक अवैध दारु विक्री-जुगार आदी धंद्यावर कारवाई करुन ते धंदे समूळ उद्धवस्त करण्यात आले. याच गुन्ह्यांत पंचवीस आरोपींना अटक करण्यात आली. महाराष्ट्र-मुंबई पोलीस कायदा कलम १४२, १२०, १२२, १३५ आणि १४२ कलमांतर्गत एकूण ८२ जणांवर कारवाई करण्यात आली. संपूर्ण मुंबई शहरात १ हजार ६०५ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यात ५ हजार ८३६ दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी तपासण्यात आले. १ हजार ५५८ वाहन चालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत तर एकावर ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. मुंंबई शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने एकून ७३८ हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली होती तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे, संवेदनशील ठिकाणी ५३९ ठिकाणाची तपासणी करण्यात आली होती.

मतदान सुरळीत व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली असून सोमवारी दिवसभरात पोलीस आयुक्तांसह सर्व सहपोलीस आयुक्त, पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त २५ पोलीस उपायुक्त, ७७ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ४७५ पोलीस अधिकारी, २२ हजार १०० पोलीस अंमलदार, तीन दंगल नियंत्रण पथकाला सर्वत्र तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त १७० पोलीस अधिकारी, ५ हजार ३६० पोलीस अंमलदार, ६ हजार २०० होमगार्ड आदींची मदत घेण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या ३६ ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलाला बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी होणार्‍या मतदानासाठी संपूर्ण शहरात २ हजार ७५२ पोलीस अधिकारी, २७ हजार ४६० पोलीस कर्मचारी, ६ हजार २०० होमगार्ड, तीन दंगल नियंत्रण पथक, ३६ केंद्रीय सुरक्षा दलाचा समावेश असणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page