दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बच्या निनावी कॉलने खळबळ

सतत येणार्‍या बॉम्बच्या अफवेमुळे मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ मे २०२४
मुंबई, – मुंबईसह पुणे, सांगली शहरात होणारा संभाव्य बॉम्बस्फोटाच्या बोगस कॉलसह छत्रपती शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत घातपातासंदर्भात आलेला कॉलची घटना ताजी असतानाच शनिवारी दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बच्या निनावी कॉलमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र मॅकडोनाल्ड हॉटेलसह परिसराची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांत सतत येणार्‍या बॉम्बच्या बोगस कॉलमुळे मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण पडत असून अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेशच पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.

पाच दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने मुंबईसह पुणे आणि सांगली शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सचिन शिंदे या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत सचिन हा दारुच्या आहारी गेल्याने त्याचे त्याच्या पत्नीसोबत सतत खटके उडत होते. या भांडणाला कंटाळून ती माहेरी निघून गेली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने कंट्रोल रुमला मुंबईसह पुणे आणि सांगली शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल केला आहे. अटकेनंतर त्याला सांगली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान घातपात होणार असल्याचा एक कॉल कंट्रोल रुमला आला होता. मात्र हा कॉलदेखील बोगस असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच कन्नप्पा रेड्डी याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. टिव्हीवर सभा पाहून टाईमपास म्हणून त्याने हा कॉल केला होता. मात्र बोगस कॉल करुन टाईमपास करणे त्याच्या चांगलेच अंगलट आले होते.

या दोन्ही घटनेनंतर शनिवारी पुन्हा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल केला होता. संबंधित व्यक्तीने बसने प्रवास करताना त्याला दोनजण मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोटाविषयी बोलताना दिसून आले. त्यामुळे त्याने हा कॉल केला होता. या कॉलनंतर स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्‍वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण मॅकडोनाल्ड हॉटेलसह परिसराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कुठेही आक्षेपार्ह वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे तो कॉल बोगस असल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर पोलिसांनी कॉल करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page