मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मे २०२४
मुंबई, – विक्रीसाठी दिलेल्या महागड्या होंडा सिटी कारचा अपहार करुन पळून गेलेल्या एका व्यावसायिकाला दहा महिन्यानंतर अटक करण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. देवेंद्र सुरी ऊर्फ फौजी असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून लवकरच अपहार केलेली होंडा सिटी कार ताब्यात घेतली जाणार आहे.
जोगेश्वरी येथे राहणार्या मोहम्मद इलियास शेख इब्राहिम यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसायासह स्वतचे गॅरेज आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी काळबादेवी येथे राहणार्या एका मित्राकडून एक महागडी होंडा कंपनीची होंडा सिटी कार खरेदी केली होती. या कारचे कागदपत्रे त्यांच्याकडे होते. कार विक्री करायची असल्याने त्यांनी कार त्यांच्या नावावर केले नव्हती. कारसाठी ग्राहक शोधत असताना त्यांचा मित्र देवेंद्र सोनी याने ती कार विक्रीसाठी आपण मदत करतो असे सांगितले होते. देवेंद्र हा त्यांचा परिचित असून त्याचाही जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांनी त्याला ती कार विक्रीसाठी दिली होती. मात्र त्याने कारची विक्री न करता ती कार दुसर्या व्यक्तीलाच वापरण्यासाठी दिली होती. ही माहिती समजताच त्याने देवेंद्रकडे कारची मागणी सुरु केली. मात्र त्याने कार परत केली नाही किंवा कारच्या विक्रीतून आलेले पेमेंट दिले नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना टाळत होता. त्यामुळे त्यांनी देंवेंद्रविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारचा अपहार करुन मोहम्मद शेख यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दहा महिन्यानंतर जोगेश्वरी येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने ती कार कोणाला दिली आहे याची माहिती काढली जात असून लवकरच ती कार ताब्यात घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.