मुलाचे लग्न होईल, सोन्याची जागा बदला असे सांगून फसवणुक
सोन्याच्या दागिन्यांच्या जागी सुपारी ठेवली; महिलेविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मे २०२४
मुंबई, – मुलाचे लग्न जुळवायचे असेल तर तुमच्याकडील सोन्याचे दागिने ठेवायची जागा बदलावी लागेल, तरच मुलाचे लग्न होईल असा सल्ला देत एका वयोवृद्ध महिलेसह तिच्या मुलीने घर दुरुस्तीच्या वेळेस ठेवायला दिलेल्या सुमारे साडेपाच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. दागिने एका कपड्यात गुंडाळून डब्ब्यात ठेवून बाहेर लॉक लावल्याचे दाखवून तिने हातचलाखीने सोन्याचे दागिने काढून त्याजागी सुपार्या ठेवल्या होत्या. दिड वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस येताच या वयोवृद्ध महिलेने दागिन्यांविषयी चुकीचा सल्ला देणार्या महिलेविरुद्ध गोवंडी पोलिसांत तक्रार केली होती. वर्षा विनोद पारधे असे या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
६२ वर्षांची तक्रारदार महिला गोवंडीतील गोवंडी गाव, मच्छीमार्केटच्या एका निवासी इमारतीमध्ये दोन मुलांसोबत राहते. तिचे पती चेंबूर परिसरात राहत असून मुलगा एका खाजगी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी चेंबूर येथे राहणार्या तिच्या बहिणीने तिची वर्षांसोबत ओळख करुन दिली होती. ती लग्न जुळविण्याचे काम करत होती, त्यामुळे तिने तिच्या मुलासाठी चांगले स्थळ बघण्याची विनंती केली होती. ऑगस्ट २०२२ रोजी वर्षां तिच्या घरी आली होती. यावेळी तिने मुलाचे लग्न जुळवायचे असेल तर तिच्याकडील सोन्याची जागा बदलावी लागेल असे सांगितले होते. दागिन्यांची जागा बदलली तर तिच्या मुलाचे लग्न होईल असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून तिच्याा सांगण्यावरुन तिने तिच्यासह तिच्या मुलीचे दागिने सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने एका कपड्याच्या फडक्यात बांधून ते तिच्या घरातील स्टिलच्या डब्ब्यात ठेवून दिले होते. डब्ब्याला बाहेर लॉक लावून जोपर्यंत ती सांगत नाही तोवर तो डब्बा उघडून नकोस असे सांगितले होते. त्यामुळे ऑगस्ट २०२२ नंतर तो डब्बा उघडला नव्हता.
एप्रिल २०२४ रोजी तिच्या देवीचा उत्सव असल्याने तिने वर्षाला फोन करुन दागिने बाहेर काढू का अशी विचारणा केली होती, यावेळी तिने तिला नकार दिला होता. तिने दागिने काढले तर तिच्या मुलाचे लग्न कधीच होणार नाही असे अप्रत्यक्षपणे धमकी दिली होती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने तिच्या दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी तिला डब्ब्यात सोन्याचे दागिने नव्हते. दागिन्यांच्या जागी सुपार्या ठेवले होते. वर्षाने हातचलाखीने स्टिलचा डब्बा लॉक करताना आतील दागिने काढून त्यात सुपार्या ठेवल्या होत्या. हा प्रकार लक्षात येताच तिने गोवंडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून वर्षां पारधे हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.